महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणार्‍या कालीचरण महाराजांना अटक

। मध्य प्रदेश । वृत्तसंस्था ।
राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणार्‍या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई करण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे. बगेश्‍वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता, काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजच्या अटकेसाठी पाठवले होते.
रायपूरचे माजी महापौर प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खझउ च्या कलम 505(2) वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा वाईट इच्छा निर्माण करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे आणि कलम 294 कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील कृत्य अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरमध्ये एफआयआर दाखल होताच कालीचरण महाराज छत्तीसगडमधून पळून गेल्याची माहिती आली होती. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पथके पाठवली होती. त्यानंतर कालीचरण महाराजला रायपूरमधून अटक करण्यात आली.

Exit mobile version