। खोपोली । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी, (दि. 26) सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना खोपोलीतील साईबाबा नगर परिसरात जया बारजवळ तलवार आणि चॉपरने अज्ञातांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतत होते. यावेळी एका अज्ञात वाहनातून चार ते पाचजण उतरले. त्यांनी मंगेश यांच्या गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी घातली आणि त्यांच्यावर तलवारी व चॉपरने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मानसी काळोखे या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी याच निवडणुकीत प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता. काळोखे आणि देवकर या दोन कुटुंबांत आणि त्यांच्या पक्षांमध्ये गेल्या 15-20 वर्षांपासून वाद सुरू असल्याचे समजते. निकालादिवशीदेखील त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
काळोखे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मंगेश यांच्यावर पाळत ठेवली जात होती आणि एक संशयास्पद गाडी परिसरात फिरत होती. याबद्दल पोलिसांना कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने मोठा जनसमुदाय खोपोली शहरात दाखल झाला. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी खोपोलीकररांनी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ही घटना घडत असताना काळोखे यांना वाचविण्यासाठी मारेकऱ्यांना घाबरून कोणीही पुढे न आल्याने एक तरुण कार्यकर्ता सर्वांच्या मदतीला जाणारा मंगेश काळोखेचा राजकरणात बळी गेला असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेने खोपोली शहर हादरून गेले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात खोपोलीचे राजकारण इतक्या खालच्या थराला कधीही गेले नव्हते. मात्र, या घडनेने बीड जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांचीच प्रचिती खोपोलीतील जनतेला आली.
या घटनेमुळे पोलीस प्रशासनही हादरले असून, या घटनेनंतर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपअधीक्षक अभिजित शिवथरे, गुप्तहेर खात्याचे जिल्हा निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी खोपोली गाठून त्यांच्या आदेशानुसार खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. तपास यंत्रणेसाठी फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेला गावातील विरोधकच जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तपासाअंती या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
राष्ट्रवादीकडून प्लॅनिंग मर्डर : आ. थोरवे
मंगेश काळोखे हा निष्ठावान शिवसैनिक होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे, भरत भगत, रवी देवकर यांनीच राजकीय वादातून सूडबुद्धीने प्लॅनिंग मर्डर केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे खोपोलीसह रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, पोलीस या घटनेचा कशा पद्धतीने तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
