निळजे रेल्वे उड्डाणपुलाची करणार पुनर्बांधणी
| ठाणे | प्रतिनिधी |
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दरम्यान डबल डेकर कंटेनरची माल वाहतूक सुलभपणे व्हावी, यासाठी सध्याचा निळजे रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त करून तेथे नवा प्रशस्त पूल रेल्वेच्या वतीने उभारण्यात येणार आहे. या कामाकरिता शुक्रवार दि. 7 नोव्हेंबरपासून तीन दिवस कल्याण-शीळ मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली तरी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. कल्याण-शीळ महामार्गावरील लोढा पलावा एक्सपेरिया मॉलजवळ कल्याणहून शीळफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर ते सुरू आहे. निळजे येथील रेल्वे मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने तो तोडून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.
या कामासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार असून 7 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 9 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी कल्याण-शीळ महामार्गावरील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. निळजे रेल्वे उड्डाणपुलाखालून रेल्वेची डबल डेकर कंटेनर मालवाहतूक करताना अडथळे येत होते. पुलाची उंची वाढवल्यानंतर ही वाहतूक सोयीची होणार आहे.
कल्याणहून शीळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण-शीळ रोड, निळजे कमानीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने निळजे कमानजवळून उजवीकडे वळण घेऊन लोढा पलावाकडून कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीवरून महालक्ष्मी हॉटेलपर्यंत जाऊन पुढील प्रवास करतील. तर लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन, एक्सपिरिया मॉलकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना निळजे पूल चढणीजवळ प्रवेश बंद आहे. ही वाहने शीळफाट्याच्या दिशेने जाऊन देसाई खाडी पुलावरून सरस्वती टेक्सटाईल समोरून उजवीकडे वळण घेऊन नवीन पलावा उड्डाणपुलावरून जातील.
