| उत्तर प्रदेश | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे मंगळवारी (दि.4) सकाळी मोठा रेल्वे अपघात घडला. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर च्या विशेष मालवाहू मार्गावर दोन मालगाड्यांची जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही लोको पायलट गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर रेल्वे मार्गावर एक मालगाडी सिग्नल लागल्यामुळे थांबली होती. त्याचवेळी कानपूर-फतेहपूर मार्गावर खागा जवळील पांभीपुर येथे दुसऱ्या एका भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे समोरील मालगाडीचे इंजिन आणि गार्डचा डबा रुळावरून खाली गेला. या मार्गावर केवळ मालगाड्यांची वाहतूक सुरू असल्यामुळे प्रवासी रेल्वेगाड्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. या अपघातात दोन्ही मालगाड्यांचे लोको पायलट गंभीर जखमी झाले आहेत. यांना तातडीने नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे व्यावसायिक रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरील अनेक मालगाड्या थांबवण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अपघातग्रस्त ट्रॅकवरील रुळ दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू असून, लवकरात लवकर मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.