| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या रस्त्यावर रविवारी (दि.2) रात्री साडेआठ वाजता दोन दुचाकीवरुन जाणा-या चालकांमध्ये दुचाकी दामटवणे आणि हुलकावणी दिल्याने शुल्लक शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यवसन नंतर मारहाणीत झाले. हेल्मेटने वारंवार डोक्यात प्रहार केल्याने जखमी अवस्थेमधील 45 वर्षीय शिवकुमार शर्मा हे खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पोलीसांनी सुद्धा तक्रार लिहून घेतली. तक्रार लिहीण्याच्या अखेरच्या क्षणी संबंधित शर्मा हे बेशुद्ध झाले. पोलीसांनीच शर्मा यांना तातडीने मेडीसीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगीतले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजता उत्सव चौकाच्या जवळ दोन दुचाकीस्वारांचे वाहन पुढे दामटविणे आणि हुलकावणी दिल्याने भांडण झाले. या रस्त्यावरुन जाणा-या इतर वाहनचालकांनी भांडणामध्ये मध्यस्थी न केल्याने भांडणाचे स्वरुप मारहाणीत झाले. हेल्मेटने वारंवार शिवकुमार याच्या डोक्यात चारवेळा मारहाण केल्यामुळे शिवकुमार अत्यवस्थ झाला. खारघर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत स्वतः शिवकुमार हे दुचाकी चालवून गेले. तेथे त्यांनी रितसर 22 वर्षीय व 25 वर्षीय संशय़ीत मारेक-यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला. 22 ते 25 वयोगटातील मारेक-यांना पकडण्यासाठी पोलीसांची 15 वेगवेगळी पथक कार्यरत असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी दिली आहे.