| मुंबई | प्रतिनिधी |
सततच्या आजारपणाला कंटाळून 53 वर्षीय महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मुलुंड परिसरात घडली आहे. महिला मूळची पुण्यातील रहिवासी असून, उपचारासाठी बहिणीच्या घरी आली होती. महिलेला गेल्या 27 वर्षांपासून मधुमेहाचा आजार होता. कुटुंबियांनी कोणताही संशय व्यक्त केला नसल्यामुळे मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.
सुनीता विजय येवले (53) या मूळच्या पुण्यातील दौंड येथील रहिवासी होत्या. त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. त्यासाठी त्या मुलुंड येथील दत्तगुरू सहकारी गृहनिर्माण संस्था येथील बहिणीच्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या. सोमवारी (दि.3) इमारतीच्या सातव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. महिलेची बहिणी, पती व मुलगा यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. महिलेला 27 वर्षांपासून उच्च मधुमेहाचा त्रास होता. दोन वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तसेच त्यांना डोळ्याचाही आजार होता. डोळ्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी महिलेला मुंबईत आणण्यात आले होते. पण त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुटुंबियांनी कोणाविरोधात संशय व्यक्त केलेला नाही. मुलुंड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.