महिलांच्या इलिट स्प्रिंट टू लॅपस् प्रकारात सोनेरी यश
| रुद्रपूर | क्रीडा प्रतिनिधी |
जेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या श्वेता गुजाळ हिने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅक सायकलिंगमध्ये इलिट स्प्रिंट टू लॅपस् प्रकारात सुवर्णपदक जिंकून स्पर्धेचा सातवा दिवस गाजविला. शिवालिक वेलोड्रम मनोज सरकार रुद्रपूर स्टेडियमवर ट्रॅक सायकलिंग स्पर्धा सुरू आहे. पुण्याच्या श्वेता गुंजाळ हिने अपेक्षेप्रमाणे पहिल्या झटक्यात मुसंडी मारली. मग ही आघाडी टिकवत या मराठमोळ्या सायकलपटूने सुवर्णपदकावर नाव कोरले. अंदमान निकोबारच्या सेलेस्टिनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर दिल्लीची त्रियशा पौल कांस्यपदकाची मानकरी ठरली.
सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास होताच. त्रिवेंद्रममधील खेलो इंडियाच्या साई अकादमीतील सरावाचा मला फायदा मिळाला. आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायचे माझे स्वप्न आहे.
श्वेता गुंजाळ