| कोल्हापूर | प्रतिनिधी |
देशभरात आयपीएलसह विविध क्रिकेट स्पर्धांदरम्यान क्रिकेटप्रेमींचा नेहमीच उत्साह दिसून येतो. क्वचितच इतर क्रीडा स्पर्धांबाबत क्रीडाप्रेमींची उत्सुकता आणि उत्साह दिसून येतो. मात्र, कोल्हापूर शहर त्याला अपवाद आहे. फुटबॉलची विश्वचषक आजपासून सुरू होत असताना शहरातील फुटबॉलप्रेमींचा उत्साह दिसून आला.
चार वर्षांनी येणारा फुटबॉलचा महाकुंभ फिफा विश्वचषक स्पर्धा आजपासून अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. तब्बल 48 देश, 104 सामने या स्पर्धेदरम्यान खेळले जाणार आहेत. यासाठी जगभरातील फुटबॉल शौकिनांमध्ये उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार पेठ या पारंपारिक पेठांमधील फुटबॉल प्रेमी विश्वचषकासाठी सज्ज झाले आहेत.
कोल्हापुरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या गुलाब गल्लीत चॅलेंज ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण गल्लीत प्रत्येक देशाचे झेंडे आणि फुटबॉल खेळाडूंचा फोटो पताका करून गल्लीला सजावट केली आहे. फुटबॉल विश्वचषक जरी प्रत्यक्ष पाहायची संधी मिळत नसली तरी मनमुराद फुटबॉल प्रेम करून आपल्या आवडत्या खेळाडूला क्रीडा नगरी कोल्हापुरातून आम्ही पाठिंबा देत आहेत.
रोनाल्डो, मेस्सी, नेमार साठीच आम्ही बघतो-कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून दरवर्षीचा फुटबॉल हंगाम सुरू होतो. यासाठी कोल्हापूर शहरातील तालमी आणि पेठांचे संघ सहभागी होतात. हे सामने पाहण्यासाठी लक्षणीय गर्दी स्टेडियमवर पाहायला मिळते. या सोबतच पेठमध्ये जगभरातील अनेक देशांच्या प्रसिद्ध खेळाडूंचे फॅन्स क्लब आहेत. पोर्तुगालचा प्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, अर्जंटीना संघाचा खेळाडू लिओनल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार या खेळाडूंची कट्टर चाहते कोल्हापुरात पाहायला मिळतात. या तिन्ही ही प्रसिद्ध खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.







