‘आरसीएफ’ तर्फे कामगार चषक आदिवासी स्पर्धा

जिल्ह्यातील 64 कबड्डी संघांचा सहभाग

| अलिबाग | प्रतिनिधी |

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) लिमिटेड, थळतर्फे अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 64 आदिवासी संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

कामगार दिनाचे औचित्य साधून आरसीएफ क्रीडा संकुल कुरुळ येथे सोमवारी (दि. 1) आयोजित कामगार चषक आदिवासी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक सुनील ठोकळ, महाव्यवस्थापक शशिकांत उखळकर, नितीन हिरडे, संजीव हरलीकर यांसह सर्व संघटना पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. कामगार दिनानिमित्त दिवंगत कर्मचार्‍यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यकारी संचालक अनिरुध्द खाडिलकर, सुनील ठोकळ, अलिबाग प्रेस असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजन वेलकर आणि शशिकांत उखळकर यांच्या हस्ते क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या क्रीडानैपुण्याला वाव देण्याच्या उद्देशाने आरसीएफतर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या स्पर्धेचे आयोजन करता आले नव्हते. मात्र, यावर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय आरसीएफ थळ प्रकल्प व्यवस्थापनाने घेतला. त्याला रायगड जिल्हा आदिवासी संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढत्या उष्मेचा त्रास खेळाडूंना होऊ नये याची खबरदारी म्हणून यावर्षी आच्छादित क्रीडांगणात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विजेत्या संघास कामगार चषक आणि 25000 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघास रोख रुपये 15000 आणि ट्रॉफी देण्यात येईल. याशिवाय तिसरा व चौथा क्रमांक मिळवणार्‍या संघास बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक पारितोषिकेदेखील दिली जाणार आहेत.

Exit mobile version