कामोठेकर उग्र वासाने हैराण

कॉलोनी फोरमची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार; अधिकार्‍यांनी केली वसाहतीची पाहणी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

सायंकाळच्या वेळी सुटणार्‍या उग्र वासामुळे कामोठे वसाहतीमधील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत कामोठे कॉलोनी फोरमकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी कामोठ्यात येऊन पाहणी केली.

कामोठे वसाहतीत दररोज सायंकाळी रसायनांचा वास येत होता. खाडीकिनारील सेक्टर 36 येथे या वासाचे प्रमाण जास्त होते. दिवसभर अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. कामोठे कॉलोनी फोरमच्या समन्वयकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांना कालच्या प्रकाराबाबत जाब विचारत तात्काळ पाहणी करण्यासाठी मेसेज केले. त्याचीच दखल घेत रविवारी रात्री 11.30 वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे विद्याधर किल्लेदार, उमेश जाधव, डॉ. धपाटे असे तीन अधिकारी सेक्टर 36 येथील खाडीकिनारी पाहणीसाठी आले होते.

यावेळी प्रदूषणाबाबत उपस्थितांनी अधिकार्‍यांना जाब विचारला असता टँकरद्वारे केमिकल खाडीमध्ये सोडले जात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली, तसेच काही महिन्यांपूर्वी कळंबोली येथे एका टँकरवर कारवाई केली असून, लवकरच कामोठे खाडीकिनारी गस्त वाढवत केमिकल टँकरवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच तळोजा एमआयडीसीमधील प्रक्रिया केलेले केमिकलयुक्त सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन कामोठे खाडीजवळ फुटली असून, त्यामधूनसुद्धा केमिकल गळती होत आहे. त्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच ती लाईन दुरुस्त करून घेण्याबाबत अधिकार्‍यांनी आश्‍वस्त केले, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार खाडीकिनारी पोलिसांची गस्त वाढवणे तसेच सीसीटीव्ही कॅमरा बसविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

कामोठे कॉलोनी फोरमतर्फे कामोठे शहरातील वायूप्रदूषणाचा प्रश्‍न मिटत नाही तोपर्यंत सर्व शासकीय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ पाहणीपुरते काम न करता शहरातील वायू प्रदूषण थांबवण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी कामोठे कॉलोनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव यांनी केली.

यावेळी पाहणीदरम्यान कामोठे सचिव रंजना सडोलीकर, कॉलोनी फोरमचे समन्वयक बापू साळुंखे, राहुल बुधे, अरुण जाधव, संदीप लबडे, तुषार दळवी, देवानंद बाठे, प्रवीण भालतडक, भूमी टॉवर सोसायटीचे अध्यक्ष विलास कळंगे, जय गणेश सोसायटीचे अध्यक्ष संतोष सावंत उपस्थित होते.

Exit mobile version