| पनवेल | प्रतिनिधी |
संपूर्ण मराठवाड्यात पावसाने थैमान घालत शेतातील पीक, घरातील सामान आणि जनावरे वाहून नेली आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी बांधवांवर उपासमारीची वेळ आली असून, सरकारची मदत अपुरी पडत आहे. या कठीण काळात कामोठेकरांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी दाखवत मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामोठेतील नागरिक मोठ्या प्रमाणावर साहित्य जमा करत आहेत. त्यात तेल, धान्य, डाळी, कडधान्य, कपडे, चादरी, शाळकरी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, सुका खाऊ अशा आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या महिला टीमकडून महिला व मुलींसाठी लागणारे साहित्य वेगळे संकलित केले जात आहे. या उपक्रमात उषा डुकरे, संगीता पवार, जयश्री झा, दीपा खरात, स्वप्नाली दोषी, सारिका शिंदे आणि शितल शितोळे यांनी पुढाकार घेतला आहे. या संकलनासाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी त्यांच्या शाळेची जागा उपलब्ध करून दिली असून शेतकरी कामगार पक्ष देखील सक्रिय सहकार्य देत आहे. जेष्ठ समाजसेविका रंजना सालोडीकर, प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, सखाराम पाटील यांच्यासह एकता सामाजिक संस्थेचे सर्व शिलेदार या मोहिमेत सहभाग घेत आहेत. याआधी सांगली, कोल्हापूर तसेच कोकणातील पूरपरिस्थितीत मदतीस धावून गेलेल्या या संस्थेने पुन्हा एकदा संकटसमयी आपली जबाबदारी जपली आहे. कामोठेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केले आहे.







