शेकाप नेते बाळाराम पाटील यांचे नेतृत्व
| पनवेल | प्रतिनिधी |
सणा सुदीच्या दिवसांत पाण्यासाठी सिडकोचे पाणी पुरवठा कार्यालय गाठण्याची वेळ कामोठेकरांवर आली आहे. पुरेसे पाणी मळित नसल्याने सोमवारी (दि.20) कामोठे वसाहतीतील सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
जिल्ह्यात दिवाळीनिमित्त अभ्यंग स्नान होत असतानाच कामोठेकरांना मात्र प्रचंड प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी नसल्याने नागरिक संतापले आहेत. येथील सेक्टर 6 अ, 6, 9, 17, 18, 19, 22, 23, 24 मधील नागरिकांना पाणी पिण्यासाठी वापरायचे कि अभ्यंग स्नानासाठी, हा प्रश्न पडला आहे. गेल्या 2-3 महिन्यांत सिडकोकडून याबाबत कोणतेही ठोस आश्वासन मळित नसल्याने महाविकास आघाडी कामोठे विभागामार्फत सेक्टर 6 अ येथील सिडकोच्या पाणी पुरवठा विभागात शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी सिडकोच्या अधिकारयांना धारेवर धरले. शेवटी सिडकोच्या अधिकारयांकडून सकारात्मक भूमिका घेत आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यात, सेक्टर 17 आणि 18 मध्ये नवीन पाईप लाईन दि.23 आक्टोबरपर्यंत आणण्यात येईल. तर, प्रत्यक्ष काम दि.27 ऑक्टोबर ला सुरु होईल. तसेच, सेक्टर 34, 35 आणि 36मध्ये नवीन पाईप लाईनचा प्रस्ताव मान्यतेकरिता पाठवला असून एक महिन्यात निविदा काढण्यात येतील. तर, ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा होतो तेथे तात्पुरत्या स्वरूपात काही दिवसांसाठी टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येईल. त्यामुळे लवकरच कामोठेकरांना नियमित पाणी पुरवठा सुरु होईल, असे लेखी आश्वासन दिल्या नंतरच महाविकास आघाडीसह कामोठेकरांना ठिय्या आंदोलन मागे घेतले.
या मोर्चात माजी नगरसेवक शंकर म्हात्रे,माजी नगरसेवक प्रमोद भगत, सखाराम पाटील, माजी नगरसेविका लिना गरड, शेकाप कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रभाकर गोवारी, अवचित राऊत, रंजना सलोडीकर, रमेश गोरे, उषा झणझणे, संगीता राऊत, रेवती सकपाळ, कुणाल भेंडे, सुनील शिरीषकर, मनसे शहर अध्यक्ष मनोज कोठारी, रुपाली धिवार, संतोष गोळे, गणेश खांडगे, बापू साळुंखे, अनिल पवार, नाना भगत, बबन गोगावले, विश्वास भगत, सचिन झणझणे, ज्ञानेश्वर म्हात्रे, मधुकर सुरते, प्रमोद म्हात्रे, राहुल पाखरे तसेच बहुसंख्येने विविध सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते.
गेले पंधरा वर्षे पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर ते आता सांगत आहेत की नवीन बांधकामांना परवानगी देऊ नका, परंतु गेल्या पंधरा वर्षांमध्ये पाण्याचे नियोजन करू शकले नाहीत ही शोकांतिका आहे. तसेच सिडको ने मनावर घेऊन किमान दिवाळीसाठी तरी नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा.
माजी आमदार बाळाराम पाटील
आम्ही पनवेल पालिकेचे रहिवाशी आहोत. परंतु, पनवेल महानगरपालिका मात्र सिडकोकडे बोट दाखवून आमच्याकडून कर वसुल करते. त्यामुळे पालिकेने आम्हाला फक्त पैशांसाठी पालिकेत घेतले आहे, असे वाटते.
अमोल शितोळे,
कामोठे शहराध्यक्ष, शेकाप






