राडारोड्यामुळे कांदळवन संकटात; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

कामोठे खाडीकिनारी टाकण्यात येणार्‍या राडारोड्यामुळे कांदळवने संकटात आली आहेत. शीव-पनवेल महामार्गालगत कामोठे येथे विस्तीर्ण खाडी किनारा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवन असून, काही भागात विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे नष्ट झालेल्या कांदळवनाच्या संख्येनुसार कांदळवनाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असणार्‍या विकासकामांमुळे निर्माण होणारा राडारोडा कांदळवन क्षेत्रात आणून टाकला जात असून, काही प्रमाणात कचरा देखील आणून टाकला जात असल्याने कांदळवनात असणारी तिवरांची व खारफुटीची झाडे नष्ट होत असल्याचा प्रकार घडत आहे. पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खाडी किनारी राडारोडा टाकणार्‍यांचे फावले आहे.

चक्रीवादळ आणि त्सुनामी यासारख्या संकटांमध्ये कांदळवन जैविक भिंत म्हणून काम करतात. समुद्रातील मासे अन्न, निवारा आणि प्रजननासाठी कांदळवनात येतात. त्यामुळे मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीनेदेखील कांदळवन महत्त्वाचे असून, लाटांपासून जमिनीची होणारी धूप रोखण्याचे कामदेखील कांदळवन बजावतात. त्याचसोबत वातावरणातील कार्बनडायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून घेणे, तापवनवाढ नियंत्रित करण्यास मदत करणे, जलप्रदूषण कमी करून घटक रसायने शोषून खाडी क्षेत्रास संरक्षण देणे आदी अनेक दृष्टीने कांदळवन महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार, कांदळवनाचे संरक्षण होणे गरजेचे आहे. असे असताना कामोठे खाडीकिनारी असलेले कांदळवन नष्ट होणे धोक्याचे असून नष्ट होत असणारी कांदळवने वाचवण्यासाठी सर्वसामान्यांसोबत प्रशासनानेदेखील प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत निसर्गमित्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कायद्याची भीती नाही
निसर्गाप्रती कांदळवनांचे असणारे महत्त्व ओळखून शासनातर्फे कांदळवन वाचवण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. याकरिता विशेष कांदळवन कक्षाची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. मात्र, राज्यात असणार्‍या विस्तीर्ण समुद्रकिनार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. परंतु, कांदळवन कक्षाकडून कांदळवन वाचवण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न कमी पडत असून, त्यामुळे कांदळवन क्षेत्र झपाट्याने कमी होत आहेत.

निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली कांदळवने नष्ट होत आहेत. नष्ट होणारी कांदळवने वाचवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न केले तरच कांदळवन वाचणे शक्य आहे.

सचिन शिंदे
पनवेल निसर्गमित्र संस्था

खाडी किनारी कोणत्याही प्रकारचे डेब्रिज टाकताना कोणीही आढळून आले तर पालिकेचे अधिकारी तिथे जाऊन नियमित कारवाई करतात.

सचिन पवार
उपायुक्त, पनवेल पालिक
Exit mobile version