जैवविविधतेचा खजिना पाहण्याची उत्सुकता; रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत आणि कांदळवन प्रतिष्ठान निसर्ग पर्यटनांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये ‘कांदळवन निसर्ग पर्यटन’ हा जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे पर्यटकांना पर्यटनासाठी दुसरे दालन खुले झालेले आहे. जैवविविधतेचा खजिना पाहण्याची उत्सुकता आता वाढीस लागू लागली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक जवळपास 120.97 चौरस किमी एवढे विस्तीर्ण कांदळवन क्षेत्र आहे. जिल्ह्यातील समृद्ध जैविविधतेने बहरलेल्या या कांदळवनांमध्ये निसर्ग पर्यटन बहरत आहे. शिवाय समुद्र तटरक्षण होत आहे, समुद्री जीवांचे आश्रयस्थान अबाधित आहे. येथील महत्वपूर्ण जैविविधतेचा ठेवा जगासमोर येत आहे. शिवाय रोजगार निर्मिती बरोबरच आर्थिक विकासाला चालना सुद्धा मिळत आहे. याबरोबरच बहुविध जैवविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होत आहे.
कांदळवन पर्यटनास सुरुवात झाली आहे. कायाकिंग व बोटिंगला सुरुवात होईल, अशी माहिती कांदळवन वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना दिली. जिल्ह्यात 2,302.096 हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, पेण, रोहा, मुरुड, महाड व तळा या तालुक्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात रेवदंडा व आगरदांडा येथे खारफुटीच्या सर्वाधिक 11 प्रजाती आढळल्या तर कुरुळ, भालगाव, वाशी- हवेली येथे 10 प्रजाती आढळल्या आहेत.
कांदळवन निसर्ग पर्यटनाचा आनंद शेकडो पर्यटक घेत आहेत. कांदळवन निसर्ग पर्यटनासाठी आवश्यक असलेली कायाक, नौका, दुर्बीण आदी विविध साहित्य शासनाकडून 90 टक्के सबसिडीने देण्यात येणार आहे. त्याबरोबरच प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील दिले जात आहे. या माध्यमातून आगामी काळात येथे हजारों लोकांना रोजगार निर्माण होईल. तसेच जगभरातील लोकांना येथील जैवविविधता व निसर्गाचा खजिना जवळून पाहता व अनुभवता येईल.
सिद्धेश कोसबे, अध्यक्ष दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटन गट
सोशल मीडियाचा वापर
येथील कांदळवन निसर्ग पर्यटनाची माहिती जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहोचावी व पर्यटनाला चालना मिळावी यासाठी काळींजे कांदळवन निसर्ग पर्यटन या नावाने फेसबुक वर इंस्टाग्राम पेज बनवण्यात आले आहे. असेच पेज दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटनाचे देखील बनविण्यात येणार आहे.
स्थानिकांना प्रशिक्षण व सहाय्य
काळींजे व दिवेआगर या गावांमधील स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी आणि कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धनास प्रोत्साहित करण्यासाठी हाती घेतलेल्या समुदाय-आधारित संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुरुवातीच्या तांत्रिक आणि आर्थिक पाठिंब्यानंतर, निसर्ग पर्यटनाच्या या प्रकल्पाचे नियोजन संपूर्णपणे स्थानिक समुदायाद्वारे करण्यात येत आहे.