केन विल्यमसनने सोडले कर्णधारपद

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने सोमवारी रात्री पापुआ न्यू गिनी संघावर मात करीत टी-20 विश्वकरंडकाचा आपला शेवट गोड केला. मात्र, त्यांचे या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडच्या सुमार कामगिरीचे पडसाद कर्णधार केन विल्यमसन याच्यावरही उमटले आहेत. आता संघाची खराब कामगिरी लक्षात घेऊन कर्णधार विल्यमसननेही एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि कर्णधारपदही सोडले.

टी-20 प्रकाराचा पुढील विश्वकरंडक 2026 मध्ये होणार आहे. न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानेही हा आपला अखेरचा टी-20 विश्वकरंडक असेल अशी घोषणा केली. आता केन विल्यमसनही बोल्टच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात त्याने सांगितले की, खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्यासोबतच केन विल्यमसनने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. आपल्या निर्णयाबाबत केन विल्यमसन म्हणाला की, न्यूझीलंडसाठी मी सर्व फॉरमॅटमध्ये खेळलो यांचा मला आनंद आहे आणि मी भविष्यातही योगदान देत राहीन. पण आता मी केंद्रीय करार स्वीकारण्यास असमर्थ आहे. न्यूझीलंडसाठी खेळणे अजूनही माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, क्रिकेटबाहेरील माझे जीवन खूप बदलले आहे. ज्यात मला आता माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे.

Exit mobile version