कांगारूने बदलले विजयाचे समीकरण

सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने नामिबियाला हरवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. नामिबिया 72 धावांवर ऑल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5.4 षटकांत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज गाठले. आता ऑस्ट्रेलिया सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर आता नामिबियाही सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला 17 षटकांत अवघ्या 72 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा सामना एकतर्फी केला होता. कांगारू संघाकडून अ‍ॅडम झाम्पाने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय हेझलवूड आणि स्टॉइनिसने 2-2 विकेट घेतल्या.

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियाला 14 धावांच्या स्कोअरवर तिसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूवर निकोलस डेव्हिनचा (2) पहिला धक्का बसला. त्यानंतर चौथ्या षटकात जॉन फ्रायलिंकने (1) दुसरी विकेट टाकली. यानंतर संघाची तिसरी विकेट 5व्या षटकात मायकेल व्हॅन लिंगेनने 10 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा केल्या आणि विकेट टाकली. त्यानंतर संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड व्हीजे (1) सहाव्या विकेटच्या रूपात 11व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. पुढे जात रुबेन ट्रम्पलमनच्या 13व्या षटकात सातवी विकेट पडली. ट्रम्पलमॅनने 7 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 7 धावा केल्या होत्या. त्यानंतर नामिबियाला 8वा धक्का बर्नार्ड शॉल्ट्झच्या रूपाने बसला, त्याला झांपाने खाते न उघडता त्रिफळा उडवत पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर संघाने चांगली खेळी खेळणारा कर्णधार गेरहार्ड इरास्मसची (36) नववी विकेट गमावली. आणि त्यानंतर नामिबियाने 17व्या षटकात बेन शिकोंगोच्या रूपात 10वी विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने 8 चेंडूत 20 धावा, ट्रॅव्हिस हेडने 17 चेंडूत नाबाद 34 आणि मिचेल मार्शने 9 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. ग्रुप स्टेजमध्ये एक सामना शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने सुपर-8 साठी आधीच आपली जागा निश्‍चित केली आहे. कांगारू संघाला आता शेवटचा गट सामना 16 जून रोजी स्कॉटलंड संघाविरुद्ध खेळायचा आहे.

झाम्पाचे सर्वाधिक बळी
या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अ‍ॅडम झाम्पाने नामिबियाचे 4 बळी घेतले. यासह त्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 बळी पूर्ण केले. त्याच वेळी, तो 20 विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला. त्याने 31 विकेट घेतल्या आहेत. या यादीत त्याच्या आधी मिचेल स्टार्क 29 बळी घेऊन अव्वल स्थानावर होता.
चेंडू शिल्लक मोठा विजय
नामिबियाने दिलेले 72 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेमध्येच पूर्ण केले. त्यांनी 86 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. टी-20 विश्‍वचषकाच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय (चेंडू बाकी) होता. 2014 मध्ये चितगाव येथे झालेल्या श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात श्रीलंकेने 90 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला होता.
Exit mobile version