लायनकडून लायन्सचीच शिकार

कांगारुंची अ‍ॅशस मालिकेत आघाडी
। ब्रिसबेन । वृत्तसंस्था ।
गाबा कसोटीतील चौथ्या दिवशी नॅथन लायन याच्या खेळीमुळे लायन्सची शिकार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या खेळात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 9 विकेट्सनी पराभव करत, अ‍ॅशस मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने दुसर्‍या डावात 297 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 9 फलंदाज राखून पार केले. नॅथन लायनने इंग्लंडच्या दुसर्‍या डावाला चौथ्या दिवशी खिंडार पाडले. त्याने 4 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 2 बाद 220 वरुन सर्वबाद 297 अशी झाली. इंग्लंडने चौथ्या दिवशी 2 बाद 220 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र लायनने डेव्हिड मलानला 82 धावांवर बाद करत रूट – मलान ही दीडशतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. येथूनच इंग्लंडच्या दुसर्‍या डावाला मोठी गळती सुरु झाली. बघता बघता 2 बाद 220 वर असणर्‍या इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावा संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाकडून ऑफ स्पिनर नॅथन लायनने 91 धावा देत 4 बळी टिपले. त्याला कमिन्स आणि ग्रीनने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. स्टार्क आणि हेजलवूडने प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडला दुसर्‍या डावात फक्त 19 धावांचीच आघाडी घेता आली.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 20 धावांची गरज होती. मात्र या 20 धावा करतानाही ऑस्ट्रेलियाने एक फलंदाज गमावला. अ‍ॅलेक्स कॅरीला रॉबिन्सनने 9 धावांवर बाद केले. अखेर ऑस्ट्रेलियाने 6 व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब करत गाबावरील विजयी परंपरा कायम ठेवली. तत्पूर्वी, गाबा कसोटीत इंग्लंडने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक मार्‍यासमोर इंग्लंडचा पहिला डाव 147 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने 5 विकेट्स घेतल्या.
यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 425 धावांचा डोंगर रचला. ट्रॅव्हिस हेडने धडाकेबाज फलंदाजी करत 148 चेंडूत 152 धावांची तुफानी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनेही 94 धावांचे योगदान दिले. तर मार्नस लॅम्बुशग्नेने 74 धावा केल्या. तर दुसर्‍या डावात इंग्लंडने झुंजार वृत्ती दाखवत दमदार सुरुवात केली. कर्णधार जो रुट आणि डेव्हिड मलान यांनी तिसर्‍या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी रचली. रुटने 89 तर मलानने 82 धावांची खेळी केली.
मात्र चौथ्या दिवशी नॅथन लायनने इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडत 2 बाद 220 वर असणार्‍या इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावात गुंडाळला. लायनने 4 विकेट घेतल्या. त्यानंतर 19 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 व्या षटकात पार करत गाबा कसोटी आपल्या नावावर केली.

Exit mobile version