गळक्या शाळेत मुली गिरवताहेत धडे

अमृतमहोत्सवी वर्षात कन्याशाळा गळकी

रोहा पं.स. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

| नागोठणे | वार्ताहर |

देशात सर्वत्र स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमिताने झगमगाट सुरु आहे. देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, असे असतानाच रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यातील राजिप कन्याशाळेला गेल्या वर्षभरापासून गळती लागली आहे. रोहा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या प्रकाराकडे डोळेझाक केल्याने गळक्या शाळेत धडे गिरविण्याची वेळ मुलींवर आली आहे. त्यामुळे पालक व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नागोठण्यातील याच शाळेतून शिक्षण घेतलेल्या मुली आज सरकारी सेवेत व इतर ठिकाणी उच्च पदे भूषवित आहेत. असे असतानाच या कन्याशाळेच्या दुरवस्थेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. पहिली ते चौथीपर्यंत 37 पटसंख्या असलेल्या या शाळेचे छप्पर सर्वत्र गळत आहेत. शाळेच्या व्हरांड्यातच पावसाचे पाणी पडत असल्याने त्याचा ओलावा वर्गखोल्या तसेच शाळेच्या कार्यालयात निर्माण होत आहे. तसेच मुलींना त्या पाण्यातूनच आपल्या वर्गात जावे लागत असल्याने वर्गखोल्यांमध्येही पाणी जमा होत असून, बसण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. शाळेच्या छपराचे व भिंतींचे प्लास्टर अनेक ठिकाणी निघाले आहे. एखाद वेळी हे प्लास्टर खाली पडून जर कोणत्या मुलीला अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न पालक विचारात आहेत. याशिवाय प्रस्तावातील पिण्याच्या पाण्याची टाकीची व शौचालयाची दुरुस्ती ही कामेही लाल फितीत अडकली आहेत.

दुरुस्तीचा प्रस्ताव पडून

नागोठणे विभागातील कोंडगाव, निडी व इतर अनेक शाळांचे दुरुस्तीचे प्रस्ताव गेल्यावर्षी मंजूर करण्यात येऊन त्या शाळांची दुरुस्तीही करण्यात आली. मात्र, कन्याशाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्यावर्षी पाठवूनही तो का मंजूर करण्यात आला नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांची यासंदर्भात कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका कृती पडवळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपाली परदेशी, सदस्या साक्षी नावले, मोरेश्‍वर सागणे व इतर पालकांनी भेट घेऊन शाळेच्या दुरवस्थेची कल्पनाही दिली आहे. याबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्‍वासन मेघना धायगुडे यांनी दिले आहे.

शाळेची किरकोळ दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीने यापूर्वीही केली आहेत. पावसामुळे छपरावर चढण्यासाठी माणसे मिळत नसल्याने पाऊस कमी होताच गळती थांबविण्यासाठी आवश्यक ते काम करण्यात येईल. तसेच मुख्याध्यापिकांच्या अर्जानुसार शाळेतील दुरुस्तीच्या नवीन प्रस्तावासाठी लागणारा ठराव व नाहरकत दाखला तातडीने देण्यात येईल.

डॉ. मिलिंद धात्रक, सरपंच
Exit mobile version