कपिल देव यांना भारतरत्न द्यावा

डोडा गणेश यांची मागणी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
दिग्गज क्रिकेटपटू तथा कप्तान कपिल देव यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे, अशी मागणी भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांनी केली आहे. तशी इच्छा त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्यक्त केली आहे.
गणेश यांच्या मते, 1983 च्या विश्‍वचषक विजेतेपदाने मास्टर ब्लास्टरला क्रिकेट खेळण्यास प्रेरित केले. या विजेतेपदामध्ये कपिल देव हे भारतासाठी महत्त्वाचे खेळाडू होते. आणि 2011 मध्ये भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला, तेव्हा सचिन तेंडुलकरलाच वर्ल्ड चॅम्पियन झाल्याची जाणीव झाली.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव करून 1983चा विश्‍वचषक जिंकला होता. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ 183 धावांवर ऑलआऊट झाला.
कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी 38 धावा केल्या आणि ते संघासाठी सर्वोत्तम धावा करणारे खेळाडू ठरले. तर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला 140 धावांवर रोखून विजेतेपद पटकावले.
मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, त्यांनी 7 षटकांत 12 धावांत 3 बळी घेतले. अमरनाथ यांनी फलंदाजीत 26 धावांचे योगदान दिले. कपिल देव यांच्या शानदार झेलसाठीही हा सामना लक्षात राहिला आहे. कपिल देवने मिडविकेटवरून धावताना व्हिव्ह रिचर्ड्स यांचा अप्रतिम झेल घेतला.

Exit mobile version