करंजा-रेवस रो-रो सेवा रखडली

काम रखडल्याने 2023 उजाडण्याची शक्यता
। उरण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागमधील रेवस व उरणच्या करंजा बंदराच्या दरम्यान महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून रो-रो सेवेचे काम सुरू असून मे 2022 पर्यंत मुदत असतानाही हे काम रखडले आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबर 2022 पर्यंत वेळ लागण्याची शक्यता असल्याने नव्या वर्षांतच सेवेला सुरुवात होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
उरण ते अलिबाग हे रस्त्याने 60 किलोमीटर अंतर आहे. तर उरणमधील करंजा बंदर ते अलिबागच्या रेवस बंदरातून जलप्रवास केल्यास 20 मिनिटात हे अंतर पार करता येते. राज्य सरकारने अलिबागच्या दळणवळणासाठी मुंबई व उरण या दोन भागांना जोडण्यासाठी गोवा राज्यात चालणार्‍या चारचाकी वाहने वाहून नेणार्‍या रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा ही रो रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून अवघ्या तासाभरात आपल्या वाहनास अलिबागमध्ये पोहचता येते. अशाच प्रकारची सेवा उरण ते अलिबागमधील रेवस ते करंजा दरम्यान करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने घेतला होता. यातील करंजा बंदराची जेट्टी तयार होऊन तीन वर्षे झाली आहेत. मात्र रेवस जेट्टीचे काम रखडल्याने ही सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे.

60 टक्के काम पूर्ण
रेवस बंदरातील जेट्टीचे काम मे 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र सध्या 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

Exit mobile version