| उरण | प्रतिनिधी |
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तब्बल चार कोटींचा निधीतून नव्याने बांधण्यात आलेला उरण-करंजा रस्ता केवळ दोन महिन्यांतच खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यामुळे प्रवाशांना व नागरिकांना जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार म्हणजे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमतात झालेल्या उघड उघड भ्रष्टाचाराचे उदाहरण असून, शासनाच्या प्रतिष्ठेलाच या गैरकारभाराने धक्का बसला आहे. शासनाचा पैसा खाऊन निकृष्ट माल वापरून केलेले हे काम म्हणजे जनतेच्या विश्वासघाताचे प्रत्यक्ष चित्र आहे, असे स्थानिकांमधून बोलले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका युवा उपाध्यक्ष मुकेश प्रकाश थळी यांनी उपविभागीय अभियंत्यास दिलेल्या पत्राद्वारे या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत ठेकेदाराच्या निकृष्ट कामगिरीवर तात्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. गणेशोत्सवाच्या सणाआधी हा रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिक व भाविक मोठ्या संकटात सापडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






