करंजाडेकरांची घागर रिकामीच

पाण्यासाठी सिडकोला धडक

| पनवेल | प्रतिनिधी |

करंजाडे वसाहतीमधील नागरिकांच्या घागरी गेल्या कित्येक आठवड्यांपासून यापूर्वीच उताण्या झालेल्या आहेत. अनेक आंदोलने करूनसुद्धा सिडको प्रशासन रिकाम्या घागरी भरण्यास उत्सुक नाही. अखेरीस संयमाचा अंत झाल्यामुळे येथील नागरिकांनी सिडको कार्यालयावरती धडक देण्याचे नियोजन केले आहे. मंगळवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी सीबीडी बेलापूर येथील सिडको मुख्यालयावरती करंजाडे वसाहतीमधील नागरिकांचा मोर्चा धडकणार आहे.

रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी या मोर्चाच्या नियोजनाबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. सेक्टर 5 अ आणि सेक्टर 6 येथील नागरिक अक्षरशः घरे विकून अन्यत्र स्थलांतरित होऊ लागले आहेत. अन्य सेक्टरमध्येदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली करंजाडे वसाहतीमधील नागरिक एकवटे आहेत.18 एम एल डी पाण्याची आवश्यकता असून देखील सिडको अवघी 12 ते 13 एमएलडी पाणी प्रतिदिन पुरविते. त्यातही नियोजन नसल्यामुळे काही सेक्टरना मुबलक पाणी मिळते तर बाकीच्या सेक्टर्समधील घागरी अक्षरशः रिकाम्या आहेत.

मंगळवारी आय लव करंजाडे या सेल्फी पॉइंट येथे सगळे नागरिक एकवटणार आहेत.विमानतळ गाभा क्षेत्रातील रस्त्याद्वारे नागरिकांचा मोर्चा सिडको कार्यालयावर धडकणार आहे. माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी झालेल्या बैठकीत हा जलआक्रोश मोर्चा असेल, असे जाहीर करण्यात आले. तसेच राजकीय पक्षविरहित या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रामेश्वर आंग्रे यांच्याकडून करण्यात आले. यावेळी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, नंदकुमार मुंडकर, गौरव दादा गायकवाड, संदीप चव्हाण, निखिल भोपी, चंद्रकांत पाटील, सचिन केणी, समाजसेवक राम पाटील, मंगेश बोरकर, किरण पवार, संतोष पाडेकर, सुधाकर ननावरे, उमेश भोईर, योगेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version