| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चौक-कर्जत रस्ता खड्डेमय बनला आहे. पर्यटन तालुका म्हणून विकसित होत असलेल्या कर्जत तालुक्यात येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने हा मार्ग कायम वर्दळ असलेला मार्ग बनला आहे. दरम्यान, या एकेरी मार्गासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा रस्ता दुपदरी कधी होणार, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.
चौक-कर्जत रस्त्यावर काही भागात आरसिसी काँक्रिटकरण करण्यात आले असून, त्याशिवाय डांबरीकरण झालेले आहे. डांबरीकरण करण्यात आलेल्या भागात सध्या खड्ड्यांचे साम्राज आहे. 2000 साली या भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्यानंतर आरसीसी काँक्रिटकरण किंवा डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे कर्जत येथून भिसे खिंड सोडल्यानंतर या एकेरी रस्त्यावर अनेक भागात रस्त्याच्या कडेला खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना धोका उद्भवत असतो. वावरले गावाच्या समोर नव्याने बनविण्यात आलेल्या लहान पुलावर आणि अलीकडे पलीकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. तर मोरबे धरणाच्या प्रवेशद्वार येथे असलेले खड्डे आणि त्यात गतिरोधक हे वाहनचालक यांच्यासाठी धोकादायक समजले जात आहेत. तर रस्त्याच्या एका बाजूला बनलेले खड्डे ही दुचाकी चालक यांच्यासाठी त्रासदायक बनला आहे. त्यात हा रस्ता एकेरी रस्ता असल्याने वाहनचालक यांना दुहेरी रस्ता कधी बनणार, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, कर्जत-चौक रस्ता काँक्रिटचा बनविण्यासाठी शासनाने तब्बल 82 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अंतिम निर्णय दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता असून, 2024 अखेर हा रस्ता मजबूत झालेला असेल, असा विश्वास आ. महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे.