लाखो रुपये पाण्यात; नागरिक संतप्त
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा कळंब- नेरळ-माथेरान मार्गावरील काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यावर टाकलेला डांबरी कार्पेट पावसात वाहून गेल्याने नागरिक संताप व्यक्त करत असून अनेक वर्षांनी रस्त्याचे झालेले काम पहिल्याच पावसाळ्यात खराब झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे विकास पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
कळंब-नेरळ सुमारे 12 किलोमीटरचा रस्ता रहदारी साठी अत्यंत महत्वाचा समजला जातो. या रस्त्याने कळंब-पोशीर-वारे परिसरातील अनेक गावे वाड्या वस्त्या नेरळ शहराला जोडले आहेत. ग्रामीण भागातून दररोज प्रवास करणारे कामगार, व्यावसायिक, शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे सलगपणे पूर्ण काम होत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. एक भागात रस्ता चांगला झाला की दुसऱ्या भागात खड्डे पडतात. एकाच वेळी संपूर्ण रस्त्याचे काम होत नसल्याने नेरळ-कळंबदरम्यानचा प्रवास आजतागायत सुसह्य झाला नाही. अनेक वेळा प्रवाशी नागरिकांकडून मागणी करूनही रस्त्याचे दर्जेदार काम होत नसल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांचा वनवास काही संपत नाही. दरम्यान, या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी रिक्षा चालकांनी पुढाकार घेत संभाव्य धोका ओळखून या खड्ड्यात दगड मातीच्या साहाय्याने भरण्याचे काम केले आहे .
‘ते' डांबरी कार्पेटही उखडले काही महिन्यांपूर्वी नेरळ सगुणाबाग येथील शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने नेरळपासून सगुणाबागेपर्यंत रस्ता तत्परतेने केला. एका रात्रीत दहिवली पुलावरील खड्डेही भरण्यात आले, जणूकाही मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बांधकाम विभागाने ‘डांबरी' कार्पेट टाकले. मात्र, पहिल्याच पावसात डांबरी कार्पेट वाहून गेल्याने रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे.
मे महिन्यात पोशीर ते पोहीदरम्यान करोडो रुपये खर्चून जो रस्ता झाला आहे. तो सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी इथल्या प्रवासी नागरिकांना दाखवून द्यावा.नेमका रस्ता झालंय कुठे, आम्ही नवीन झालेला रस्ता शोधत आहोत.
शहनवाज पानसरे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
या रस्त्याचा पूर्णच भाग खचून वाहतूकही बंद होऊ शकते आणि दुर्घटनाही घडत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनीही आणि बांधकाम विभागाच्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी.
अविनाश भोईर, ग्रामस्थ कुरुंग
रस्त्याची अवस्था पाहता आज प्रत्येक गाडीवाल्याला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष देऊन आजपर्यंत करोडो रुपये खर्च झालेल्या या रस्त्याची आज ही दुरवस्था का झाली, हे तपासून पाहावे.
आवेश जुआरी, सामाजिक कार्यकर्ते