कर्जत आगार 100 टक्के बंद; एकही एसटी गाडी धावली नाही

। नेरळ । वार्ताहर ।
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या वेतन वाढ तसेच महागाई भत्ता आणि राज्य शासनात विलीनीकरण या मुद्यावर आज कर्जत एसटी आगार येथील सर्व कामगारांनी संप पुकारून बंद ठेवले. या मागण्यांसाठी विभागीय आणि राज्य पातळीवर उपोषण सुरू असून त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय संप पुकारण्यात आला असून कर्जत आगारातील सर्व कामगार संपात सहभागी झाल्याने कर्जत आगारातून एकही एसटी गाडी बाहेर पडली नाही. महाराष्ट्र राज्यातील एसटी कामगारांच्या सर्व संघटना यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील सर्व विभागीय कार्यालये आणि राज्य पातळीवर उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या मागण्या पुढे करण्यासाठी कर्जत एसटी आगार येथील कामगारांनी संप पुकारल्याने बंद पडला होता.कर्जत एसटी आगारातील तिन्ही कामगार संघटना यांचे सर्व सदस्य आंदोलनात सहभागी झाल्याने आज 28 ऑक्टोबर रोजी कर्जत एसटी आगारातून एकही एसटी गाडी धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून कर्जत मध्ये एसटी कामगारांचे आंदोलन 100 टक्के यशस्वी झाले. कर्जत एसटी आगारात काम करणार्‍या एसटी कामगारांची कामगार संघटना, तसेच इंटक कामगार संघटना आणि कामगार सेना यांचे सर्व सदस्य यांनी सकाळपासून आंदोलन सुरू केले होते. कामगार संघटनेचे रमेश जाधव, नागेश भरकले, कमलाकर किरंडे, सुरेश पाटील, बबन ऐनकर, सचिव विशाल गेडाम यांच्यासह तिन्ही संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते. त्या कामगारांच्या 22 ड्युट्या रद्द झाल्या असून कोणत्याही कामगाराने आज दिवसभरात ड्युटी केली नाही असा दावा तिन्ही कामगार संघटना यांचे प्रतिनिधी कडून करण्यात आला.

Exit mobile version