पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आणि कर्जत नगरपरिषद या दोन्ही नगरपरिषद यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दोन्ही नगरपरिषदांमध्ये एकाही उमेदवाराकडून नामांकन अर्ज दाखल केलेला नाही. कर्जत आणि माथेरान या दोन नगरपरिषद मिळून एकूण 41 सदस्य प्रभागनिहाय निवडले जाणार असून, थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत.
कर्जत नगरपरिषदमधील 21 सदस्यांसाठी 10 प्रभागात निवडणूक होणार आहे. कर्जत पालिकेचे थेट जनतेतून निवडून द्यायचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून, सोमवारपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. कर्जतमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. धनंजय जाधव, तर सहनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सोमवारपासून 17 नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आज नामांकन अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असलेल्या कर्जत नगरपरिषद मीटिंग हॉल आणि नगरपरिषद कार्यालयाबाहेर कर्जत पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेमध्ये दहा प्रभागांत 20 सदस्य आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यासाठी आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. माथेरान पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय बनविण्यात आले आहे. त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र सिंह ठाकूर आणि सहनिवडणूक निर्णय अधिकारी पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि कर्जत तालुका निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे यांच्यावर जबाबदारी आहे. माथेरानमध्ये पहिल्या दिवशी कोणत्याही जागेसाठी नामांकन अर्ज दाखल झाले नाहीत. माथेरान पालिकेच्या थेट जनतेतून निवडून द्यायचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण आहे. माथेरान पालिकेसाठी 4055 मतदार असून, दहा प्रभागांत मतदान करणार आहेत.
