नवीन बोगद्याचे 50 टक्के पूर्ण
| नेरळ | संतोष पेरणे |
पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर नव्याने मार्गिका टाकण्याचे काम केले जात आहे. या मार्गावर कर्जत वावर्ले या दरम्यान होणारा बोगदा हा या मार्गावरील सर्वात मोठा बोगदा असल्याचे मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून सांगण्यात येत आहे. याच मार्गावरील दोन्ही बोगद्यांची कामे वेगाने सुरु आहेत. नवीन बोगद्याचे काम पन्नास टक्के पूर्ण झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केलेला आहे. 109 कोटी रुपये खर्चून मध्य रेल्वेने पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग तयार केला, 2006 मध्ये या मार्गावर प्रथम मालवाहू वाहतूक सुरू करण्यात आली आणि त्यानंतर पहिल्यांदा 2007 मध्ये नाशिक-पनवेल-पुणे ही एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात आली. एकेरी मार्ग असताना देखील मागील काही वर्षात लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या या मार्गावर चालविल्या जात आहेत. परंतु स्थानिक प्रवाशांसाठी शटलसेवा चालविली जात नाही, त्यासाठी मागणी केल्यानंतर दुहेरी मार्ग नसल्याचे कारण रेल्वे प्रशासन देत असते. मात्र 2015 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी 200 कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. त्यावेळी सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु आता रेल्वेकडून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याने काही वर्षात या मार्गाचे दुपदरीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु या मार्गावर कर्जत जवळील बोगदा आणि चौक पासून पुढे ट्रॅकच्या बाजूने वाहणारे पाणी ही अनेक वर्षाची समस्या आजही कायम आहे. वरच्या बाजूला असलेले मोरबा धरण आणि त्यामुळे नवीन मार्ग बनविताना करावे लागणारे खोदकाम याचा परिणाम धरणाच्या बांधकामाला होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनापुढे दुहेरी मार्ग उभारण्याचे मोठे संकट आहे.
हे लक्षात घेऊन कर्जत-पनवेल मार्गावर दुहेरी मार्गिका टाकण्यासाठी नवीन मार्ग आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पनवेल-कर्जत नवीन उपनगरी मार्गाचे काम वेगाने सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई लोकलच्या पायाभूत सुविधेत महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या उभारणीस सुरुवात झाली आहे. सध्या मध्य रेल्वे वरील वापरात असलेल्या पारसिक बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा दुपटीने लांब आहे.मुंबईहून पनवेलमार्गे कर्जतला जाण्याचा पर्याय या नव्या रेल्वेमार्गामुळे उपलब्ध होणार आहे. त्याआधी 2005 मध्ये पनवेल कर्जत या मार्गावर एकेरी मार्गिका टाकण्यात आली होती. त्या मर्गिकेतील वावरले ते हालिवली या बोगद्यात तांत्रिक अडचणी मुळे उपनगरीय लोकल गाड्या चालविली जात नाही. त्यात त्यावेळी बनविण्यात आलेला मार्ग हा एकेरी असल्याने वाहतुकीस फायद्याचा नव्हता.त्यामुळे मुंबई रेल महामंडळ यांच्याकडून पनवेल कर्जत या दरम्यान नवीन दुहेरी मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. या नवीन मार्गामुळे कल्याणमार्गे कर्जतला जाण्याच्या तुलनेत या मार्गावरून वेळेची बचत होणार आहे.
मार्गावर तीन बोगदे
एमआरव्हीसीच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन (एमयूटीपी-3) अंतर्गत पनवेल-कर्जत लोकल आकारास येत आहे. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले हा बोगदा 2800 मीटर लांबीचा आहे. नढालची लांबी 219 मीटर आणि किरवलीची लांबी 300 मीटर आहे. वावर्ले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या बोगद्यांचे एकाच वेळी दोन्ही बाजूंनी कामे सुरु असून साधारण दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.कर्जत दिशेला 2800 मीटर लांबीचा बोगदा किरवली गावाजवळ निघत आहे. पूर्वीच्या कर्जत पनवेल मार्गावरील बोगदा हा हालिवली गावाजवळ निघत होता.तर 300 मीटर लांबीचा नवीन बोगदा हा किरवली गावापासून निघतो आणि आयटीआय पासून काही अंतरावर निघतो. या बोगद्याव्यतिरिक्त या मार्गावर राज्यमार्ग रस्त्यावर एक आणि मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाईन वरील असे दोन उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. कर्जतजवळील उड्डाणपूल 1,225 मीटर आणि पनवेललगतचा पूल 1,375 मीटरचा आहे. मार्च 2025पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.







