| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी कर्जत आणि पेण परिसरातून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सार्वजनिक वाहतूक सुविधांचा अभाव असल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. कर्जत किंवा पेण आगाराच्या वतीने एसटी बस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होती. विद्यार्थ्यांच्या सोईच्या दृष्टीने कर्जत दांडमार्गे पेण आणि पेण मोहोपाडा अशा दोन एसटी बस गुरुवारी (ता. 22) सुरू करण्यात आली आहे.
कर्जत आणि पेण तालुक्यातून एसटीने रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात येणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कर्जत येथून सकाळी 9.15 वाजताची पेणला सुटणारी एसटी बस बंद करण्यात आली. रसायनीकडे येताना एसटीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहचण्यासाठी कसरत करावी लागत होती. कर्जत आणि पेण, अलिबागकडे जाणार्या एसटी वाहनांची संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना अधिक खर्च करून खासगी वाहनांतून महाविद्यालयात जावे लागत होते. कर्जत आणि पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी एसटी सोडण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोईच्या दृष्टीने पेण आगाराच्या वतीने सकाळी 9 वाजता कर्जत-दांड-पेण आणि पेण येथून सकाळी 8.45 वाजता पेण-मोहोपाडा एसटी बस सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पेण आगारप्रमुख अपर्णा वर्तक यांनी दिली आहे.