चिखल मातीवरून मोटारसायकलस्वार कोसळून जखमी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रिलायन्स टाऊनशीप गेटसमोर एलएनटी प्रकल्पाच्या माध्यमातून भर पावसाळ्यात वसाहत निर्माणाचे काम सुरू आहे. सदरचा प्रकल्प हा नागोठणे पोयनाड मार्गावर सुरू असून बांधकामासाठी लागणारी खडी, माती,वाळू, डबर व इतर साहित्याची वाहतूक या मार्गावरून केली जाते. या मार्गावर चिखल व वाळू पडलेली असल्याने दिवसेंदिवस अपघाती घटनांत वाढ होताना दिसत आहे. गुरुवार ते शनिवार या तीन दिवसात पाच मोटारसायकल स्वार घसरून कोसळून जखमी झाल्याने जखमींचे नातेवाईक व स्थानिक जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
प्रकल्पाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून शनिवार (24) रोजी मोटारसायकल स्वार कोसळून जखमी झाला आहे. भविष्यात मोठे अपघात झाल्यास जीवित हानी होण्याची भीती देखील वर्तवली जात आहे. मोटारसायकल स्वारांना येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येथील कामगारांना ने आन करणार्या बसेस मुख्य मार्गालगत उभ्या केल्या जात आहेत, त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता, त्यात या उभ्या केलेल्या बसेस या देखील अपघाताला निमंत्रण देत आहेत. या प्रकल्पाद्वारे होत असलेल्या कामात सुरक्षिततेच्या बाबतीत निष्काळजीपणा केला जात असल्याचा गंभीर आरोप करीत यापुढे याठिकाणी कोणती दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंत भुरे, दीपक पाटील यांनी केली आहे. या अपघाती घटनांना संबंधित प्रकल्प जबाबदार असून वेळीच उपाययोजना कराव्यात अन्यथा स्थानिक जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.
एलएनटी प्रकल्प हद्दीत कोणतेही अपघात होऊ नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मार्गावर चिखल पसरू नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीटीकरण केले जाणार आहे.
– सागर भोसले, प्रकल्प व्यवस्थापक एलएनटी नागोठणे