पेगॅसिस लाईफस्टाईल रिसॉर्टवर कर्जत पोलिसांची कारवाई

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील भिवपुरी टाटा रोडवरील पेगॅसिस लाईफस्टाईल रिसॉर्टवर नियमांचे उल्लंघन केल्याने कर्जत पोलीस व महसुल विभागाची संयुक्तरित्या पन्नास हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान,कर्जत तालुक्यातील प्रशासनाने तयार केलेल्या तीन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कारवाया केल्या असून साधारण पावणेदोन लाखाचा महसूल गोळा झाला आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात 31 डिसेंबर साजरा करण्यात येत असुन काही रिसॉर्टवर शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे कर्जत पोलीस स्टेशन आणि महसुल विभागाला कडाव भागातील टाटा रस्त्यावर असलेल्या रिसॉर्ट मध्ये ध्वनी प्रदूषण होत असल्याची माहिती मिळाली. रात्री नऊ नंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे म्हणून आचारसंहिता बनविली असताना देखील मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास भिवपुरी टाटा रोडवरील पेगॅसिस लाईफस्टाईल रिसॉर्टमध्ये कर्कश आवाजात डीजे सुरु होता. त्याबद्दल तेथे जाऊन महसूल आणि पोलिसांच्या भरारी पथकाने कारवाई केली.
या कारवाईत रिसॉर्टमालकाकडुन 50 हजार रुपये दंड तसेच ध्वनिप्रदूषण करणारे साहित्य जप्त करण्यात आले.सदर कारवाई कर्जत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहायक पोलीस निरीक्षक संदिपन सोनावणे यांच्यासह तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्या पथकाने केली.

Exit mobile version