| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे स्थानकात पनवेल रेल्वे मार्गाने येणार्या आणि जाणार्या एक्स्प्रेस गाड्या यांच्यासाठी मार्गिका टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या नवीन मार्गिकेमुळे कर्जत रेल्वे स्थानकात येणार्या गाड्यांना लाईन बदलण्याचे क्रॉसिंग अडथळे दूर होणार आहेत.
कर्जत रेल्वे स्थानकात इएमयू आणि अन्य तीन फलाट आहेत. या स्थानकामध्ये मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरून पुण्याकडे गाड्या येत असतात. त्याचवेळी गेल्या काही वर्षांपासून पनवेल-कर्जत या नवीन एकेरी मार्गावरूनदेखील एक्स्प्रेस गाड्या आणि मालवाहू गाड्याची वाहतूक सुरु असते. त्यावेळी कर्जत रेल्वे स्थानकाच्या अलीकडे पुलाजवळ या दोन्ही मार्ग एकत्र येतात. तेथे क्रॉसिंगसाठी गाड्या थांबवून ठेवल्या जातात. त्यात पनवेल मार्गाकडे जाणार्या मार्ग एकेरी असल्याने मोठ्या प्रमाणात गाड्यांना थांबायला लागते. त्यावर मात करण्यासाठी लवकरच पनवेल-कर्जत असा दुहेरी मार्ग प्रत्यक्षात येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबून राहण्याची गरज भासणार नाही. मात्र, कर्जत रेल्वे स्थानकात देखील हीच समस्या महत्त्वाची असल्याने स्थानकातील फलाटांची संख्या वाढण्याची खरी गरज आहे. ही मागणी कर्जत पॅसेंजर असोसिएशनकडून सातत्याने मांडली जात होती.
आता कर्जत रेल्वे स्थानकात नवीन मार्गिका टाकण्याचे काम सुरु असून, सध्याच्या झोपडपट्टीच्या बाजूला ही नवीन मार्गिका असणार आहे. त्या नवीन मार्गिकेसाठी स्थानकातील पादचारी पुलाचा एक भाग काही महिन्यापूर्वी तोडण्यात आला होता. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे कामगार निवासदेखील तोडण्यात आले आहे. त्या नवीन मार्गिका उभारण्याच्या कामाला गती आली आहे. दुसरीकडे या नवीन मार्गिकेबरोबर तेथे नवीन फलाटदेखील बांधला जाणार आहे. त्याचा फायदा म्हणजे पनवेलकडून कर्जत स्थानकात येणार्या आणि कर्जत स्थानकातून पनवेलकडे जाणार्या एक्स्प्रेस गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही. तसेच पनवेलकडे जाणार्या आणि पनवेल मार्गाने येणार्या तसेच खोपोली गाड्यांसाठी फलाट तीन बरोबर नवीन असा फलाट चार देखील उपलब्ध होऊ शकतो.