वृक्षतोडीविरोधात कर्जतकरांचा कडकडीत बंद

पर्यावरणप्रेमी, शिवसैनिकांसह विविध राजकीय पक्षांची रॅली; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील टोरंट ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड याविरोधात सोमवारी कर्जतकरांनी एकजूट दाखवली. शिवसेना ठाकरे गटाने पुकारलेल्या कर्जत बंदला व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवत पर्यावरणप्रेमी आणि शिवसैनिकांनी रॅली काढून टोरंट प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

शिवसेना ठाकरे गटाने 2 नोव्हेंबर रोजी कर्जत बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळपासूनच कर्जत शहरातील दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. शिवसेनेच्या शिवालय कार्यालयातून कार्यकर्त्यांनी रॅली काढून बंदला पाठिंबा दिला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून पर्यावरणप्रेमी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रॅली काढली. ही रॅली बाजारपेठ, लोकमान्य टिळक चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचली. यावेळी शिवसेना ठाकरे गट, कर्जत पर्यावरण बचाव समिती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध संघटनांनी टोरंट प्रकल्पाला विरोध दर्शविला.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी बंदला सहकार्य करणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांचे आभार मानले. जनतेला हा प्रकल्प नको असल्याचे बंदच्या प्रतिसादातून स्पष्ट झाले असून, दिवाळीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

कर्जत पर्यावरण बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी राज्यभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. प्रकल्प रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू करण्यात आली असून, आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन वर्षभर आंदोलन सुरू ठेवण्यात येईल. साखळी उपोषणाच्या माध्यमातून टोरंट प्रकल्प हद्दपार करण्यासाठी संघर्ष तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केल.

Exit mobile version