कर्जत शेकापची युवा सेना सज्ज

पुरोगामी युवक संघटना, महिला मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती

| नेरळ | वार्ताहर |

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कामगार पक्षाची यंग ब्रिगेड सज्ज झाली असून, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर विभागवार बैठकांचे सत्रदेखील सुरु आहे. दरम्यान, पक्षाच्या वर्धापनदिनी तालुका चिटणीसपदी श्रीराम राणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, आता पुरोगामी युवक संघटना अध्यक्षपदी महेश म्हसे, तर महिला मोर्चा अध्यक्षपदी जयवंती हिंदोळा यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांच्या निधनानंतर साधारण दोन वर्षे ते पद रिक्त ठेवण्यात आले होते. त्यात पक्षाचे काम थांबू नये यासाठी प्रभारी चिटणीसपदाची जबाबदारी श्रीराम राणे यांच्याकडे देण्यात आली होती. यावर्षी वर्धापनदिन सोहळ्यात कर्जत तालुका शेकाप तालुका चिटणीस पदाची जबाबदारी श्रीराम राणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानंतर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या पदांबाबत सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी चर्च करून तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष म्हणून मानिवली ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते महेश म्हसे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी चिंचवली ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते वैभव भगत हे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष होते. तर, महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

कर्जत तालुका शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पदाधिकारी यांच्या निवडी केल्या असून, त्या दोन्ही पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, विभाग चिटणीस पांडुरंग बदे, पक्षाचे अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष बबन भालेराव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यामुळे नवीन पदाधिकार्‍यांवर रायगड जिल्हा परिषद तसेच कर्जत पंचायत समितीमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी आहे.

Exit mobile version