| कर्जत | प्रतिनिधी |
गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या कर्जत तालुका परिसराच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. 3 जानेवारी 2023 पर्यंत चालणार्या या सप्ताहात किर्तन प्रवाचनांद्वारे ज्ञानदान होणार असून एक कोटी ‘जय जय राम कृष्ण हरी’ हा नाम जप करण्याचा संकल्प आहे. दररोज गीता पठण, ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजने करण्यात येत आहेत.
माऊली मैदानावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशद्वार पूजन दत्तात्रेय व वनिता म्हसे, गणेश पूजन अनिल व पुष्पा पाटील, दीप प्रज्वलन ह. भ. प नथुराम हरपुडे, वासुदेव इंगळे, शिवाजी भासे, प्रभाकर केळकर, कलश पूजन संभाजी देशमुख, मंडप पूजन बळवंत व बिनीता घुमरे, गीता ग्रंथ पूजन रुपेश भोपतराव, ग्रंथ पूजन पांडुरंग गरवारे, वीणा-टाळ-पखवाज पूजन दीपक लाड, ध्वजारोहण विजय मांडे, व्यासपीठ पूजन तानाजी व सुचिता वांजळे यांच्या हस्ते करण्यात आले. पौराहित्य नरेंद्र जोशी यांनी केले.
याप्रसंगी संतोष वैद्य, मिलिंद तिवाटणे, चंद्रकांत म्हसे, हरिभाऊ वाघमारे, सुदाम कारले, तुकाराम बागडे आदी उपस्थित होते. या ज्ञानेश्वरी व ज्ञानयज्ञ सोहळ्यात श्रीराम महाराज पुरोहित, योगी श्री निरंजननाथ गुरु श्री शांतिनाथ यांची प्रवचने सुरु आहेत. याशिवाय मारुती महाराज राणे (कर्जत), पांडुरंग महाराज सालुंखे (सांगली), योगिराज महाराज गोसावी, अशोक महाराज जाधव (पुणे), आसाराम महाराज बडे (आळंदी), चिन्मय महाराज सातारकर, भगवती महाराज सातारकर यांची कीर्तन सेवा तसेच समारोपाच्या दिवशी काल्याचे कीर्तन ह. भ. प. चिन्मय महाराज सातारकर यांचे आहे. समारोपाच्या पूर्व संध्येला दिंडी सोहळा आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 3 जानेवारी 2023 रोजी ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांच्या काल्याचे कीर्तन व त्या नंतर महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप करण्यात येणार आहे.