46 तरुण लढ्यात सहभागी; दोघेजण देशासाठी शहीद
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. कर्जत तालुक्यातील 46 तरुण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते आणि त्यातील दोन तरुण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद देखील झाले आहेत. 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या चले जाव आंदोलनापासून कर्जत तालुक्यात क्रांतीचा लढा माथेरानचे भाई कोतवाल यांच्या पुढाकाराने सुरू झाला होता.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कर्जत तालुक्याचे योगदान मोठे आहे. कर्जत तालुक्याच्या लढाऊ बाण्याची नोंद ब्रिटिश सरकारला इंग्लंडमध्ये घ्यावी लागली होती. आपल्या देशात वेगवेगळी संस्थाने राज्य करीत असल्याने ब्रिटिशांनी आपल्यामधील भांडणाचा फायदा घेऊन 1818मध्ये भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली. शेवटी आपल्या देशातील देशप्रेमी जनतेने 1942 मध्ये उठाव केला. 1947 ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला अशी माहिती कोळंबे यांनी यावेळी दिली. त्यानंतर 1942च्या चलेजाव आंदोलनाविषयी विद्यार्थी वर्गाशी संवाद साधताना माथेरान येथील भाऊसाहेब राऊत आणि विठ्ठलराव कोतवाल यांनी कर्जत तालुक्यातील तरुणांना एकत्र करून देशाच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. त्यावेळी गोमाजी पाटील, राघो भगत ही मंडळी सोबत आली आणि अख्ख्या कर्जत तालुक्यातून तब्बल 70 च्या आसपास क्रांतिकारक यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा कर्जत तालुक्यातून सुरु केला. या लढ्याने विजेचे खांब कोसळविणे, टेलिफोन च्या तारा तोंडाने, ट्रेन बंद करणे आदी क्रांतिकारी कामे करून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडले होते. त्यामुळे कर्जत तालुक्याचे योगदान देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नोंद झाला आहे. त्यात 46 स्वातंत्र्यसैनिक यांची नोंद ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये केली आहे.
कर्जत तालुक्याचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि त्यातून निर्माण झालेला इतिहास कोणीही विसरू शकत नाही आणि त्यामुळे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील हे तरुणाचे आदर्श बनले आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील असे पिता पुत्र लढले आणि हिराजी गोमाजी पाटील हा पुत्र देशासाठी शाहिद झाला असे उदाहरण देशाच्या इतिहासात नाही आणि त्यामुळे या दोन्ही हुतात्म्यांचा आदर्श तालुका घेत असून, कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात हुतात्मांना अभिवादन करूनच कार्यक्रम सुरू होत असतात. हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचे बलिदान देशासाठी झाले असून कर्जत तालुक्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठा सहभाग दाखवला आहे. अनेक तरुण भाई कोतवाल यांच्या चळवळीत भूमिगत राहून मदत करीत राहिले तर काही तरुण लढ्यात थेट उतरले.
ब्रिटिश गॅजेटमध्ये नोंद
गोमाजी पाटील, झिपरु गवळी, राघो भगत, धाऊ डुकरे, दगडू दळवी, हरि देशमुख, गणपत देशमुख, रघुनाथ देशमुख, काशिनाथ मसणे, परशुराम देशमुख, विठ्ठल देशमुख, तुकाराम कुंभार, दामू शेलार, भाऊ पाटील, लक्ष्या कातकरी, रामा कातकरी, धोंडू कातकरी, पांडू कातकरी, रूपा कातकरी, इका कातकरी, बाळ्या कातकरी, बाळू लोहार, पेंटण्णा कोतवाल, गोपाळराव शिंदे, सीताराम खांगटे, मणिराम चौधरी, धोंडीराम चौधरी, सखाराम कदम, धोंडू पवार, गोविंद शिंदे, बाबुराव शिंदे, हरीभाऊ भडसावळे, पांडुरंग जाधव, बाळकृष्ण जुन्नरकर, मालू पादीर, सर्वोत्तम महाले, रमाबाई महाले, चिमणा सोनवळे, शंकर म्हामुणकर, दत्तात्रय डोंबे, मनहर ठोसर, भालचंद्द क्षीरसागर, आदी स्वातंत्र्यसैनिक यांची नोंद ब्रिटिश गॅजेटमध्ये आहे.







