रस्त्यांवर शुकशुकाट, सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन
|नेरळ । वार्ताहर ।
प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे पुढील तीन दिवस उष्माघाताचा त्रास जाणवणार आणि त्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 15 मार्च रोजी कर्जत तालुक्यातील तापमान 41 अंश नोंदवले गेले. पारा आणखी वर चढत गेला आणि 42 अंश एवढे तापमान नोंदवले गेले आहे. काल प्रमाणे आज देखील दुपारपासून रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान,कर्जत तालुक्याचे तापमान 42 अंश तर माथेरानचे तापमान 38 अंश एवढे नोंदवले गेले आहे.
15 मार्च रोजी तालुक्यातील पारा चाळीशी पार करून पुढे गेला होता, त्यात शासनाकडून आलेले निर्देश आणि सूचना यामुळे लोकांनी खबरदारी घेत घराबाहेर कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळले होते. तालुक्यातील दोन ठिकाणी तापमान मोजण्याची यंत्रणा आहे, तेथे दररोजचे तापमान मोजून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविली जाते.कर्जत तालुक्यात कर्जत नगरपालिका हद्दीत दापोली कृषी संधोधन केंद्राच्या भात संशोधन केंद्रात दैनंदिन तापमान मोजणारे यंत्र बसविले आहे. त्याचवेळी माथेरान या पर्यटनस्थळी गिरीस्थान नगरपालिकाकडून देखील दैनंदिन तापमान मोजले जाते आणि जिल्हा प्रशासनाला कळविले जाते.
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आज कोकणात तापमानात प्रचंड वाढ झालेली दिसून आली आणि कर्जतचे नाव वाहिन्यांवर झळकू लागले आहे. कर्जतमध्ये पारा 44 गेल्याच्या बातम्या झळकल्या आणि सर्वांचे लक्ष या प्रदूषण मुक्त तसेच फार्म हाऊस-रिसॉर्ट्सच्या तालुक्याकडे गेले. पण 15मार्च रोजी कर्जत तालुक्याचा पारा 41 अंशाच्या पुढे गेलेला नव्हता. कर्जत येथील संशोधन केंद्रात कालचे तापमान 41 अंश नोंदले गेले होते, तर 14 मार्च रोजी तापमान 40.5 एवढे होते. तर पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये 15 मार्च रोजी 36.6 इतके तापमान नोंदले गेले होते. कर्जत येथील तापमानाची नोंद 42 एवढी झाली असून सलग तीन दिवस पारा चढता आहे. माथेरान येथे आज पारा 38 पर्यंत वर गेला असून थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पारा एवढा वर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कारण पर्यटन स्थळ आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे आणि तेथे देखील तापमानात झालेली वाढ धोकादायक आहे. त्यात शासनाने दिलेल्या इशार्यानुसार आज देखील पारा चढलेला असेल अशी माहिती देण्यात आली आहे.