कर्जत तालुका पाण्याखाली

बळीराजाची चिंता मिटली

| नेरळ | प्रतिनिधी |

संततधार पावसामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. कर्जत तालुक्यात आज सकाळपर्यंत तब्बल 262 मिली पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे दहीवली मालेगाव येथील पूल पहाटेपासून पाण्याखाली गेला होता आणि त्यामुळे त्या भागातील गावकऱ्यांचे नेरळ भागाशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, पावसामुळे कर्जत-वांगणी अशी चालविली जाणारी उपनगरीय सेवा दुपारी बंद करण्यात आली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.तर चांगल्या पावसामुळे बळीराजा शेतीसाठी योग्य पाऊस झाल्याने निर्धास्त झाला आहे.

तालुक्यातून वाहणाऱ्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उल्हास नदीला पूर आला असून या नदीवरील कर्जत येथील श्रीराम पूल, तसेच चांदई, तळवडे आणि शेलू येथील पुलावरून अद्याप पाणी गेले नाही. मात्र कमी उंची असलेल्या दहीवली मालेगाव येथील पुलावरून पहाटे पासून महापुराच्या पाणी जाऊ लागल्याने नेरळ पोलिसांनी पुलावरून होणारी दोन्ही बाजू कडील वाहतूक थांबवून ठेवली आहे. पुलावरून तब्बल दीड मीटर पाणी वेगाने जात असल्याने पुलाच्या पलीकडे असल्याने गावांचा नेरळ भागाशी संपर्क बंद झाला होता. मात्र, वंजारपाडा तळवडे असा प्रवास करून स्थानिक नेरळ येथे येत असून, दहीवली पुलावरून सायंकाळपर्यंत महापुराचे पाणी वाहत होते. उल्हास नदीच्या तीरावर असलेले वावे गावात उल्हास नदीचे पाणी शिरल्याने स्थानिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

वांगणी-कर्जत लोकल धीम्या गतीने
संततधार पावसामुळे उपनगरीय लोकल सकाळच्या वेळी वेळेवर होत्या. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कायम असल्याने बदलापूर अंबरनाथ भागात रेल्वे मार्गावर पावसाचे पाणी आल्याने मध्य रेल्वेकडून सकाळी अकरा वाजता वांगणी येथून कर्जतकरिता विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, दुपारपासून उपनगरिय लोकल बंद करण्यात आल्याची उद्घोषणा मुंबई येथून करण्यात आली. त्यामुळे कर्जत, भिवपुरी आणि नेरळ स्थानकात किमान दोन तास उभे राहून लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. शेवटी प्रवासी स्थानकातून बाहेर पडले आणि खासगी वाहनांचा आधार घेऊन मार्गस्थ होताना दिसत होते. उपनगरीय लोकल सायंकाळी पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय दूर झाली.

माथेरानमध्ये 342 मिली पाऊस
माथेरानमध्ये यावर्षीचे सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले असून, सकाळपर्यंत तब्बल 342 मिली पाऊस झाल्याने माथेरान गारठले होते. त्याचवेळी माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले पर्यटक यांचे संततधार पावसाने मोठ्या प्रमाणात हाल झाले आणि घरी परतण्यासाठी निघालेले पर्यटकांना उपनगरीय लोकल बंद असल्याने तेथेदेखील हल झाले. माथेरान मध्ये आतापर्यंत महिन्यापेक्षा कमी दिवसात पावसाने 2300 मिलीचा टप्पा गाठला आहे. 22 जून रोजी माथेरानमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू झाला आणि महिन्याचे आता प्रचंड पर्जन्य येथे झाले.
.
तालुक्यात 262 मिली पावसाची नोंद
तालुक्यात उल्हास नदी, चिल्हार नदी आणि पोश्री नदी तसेच ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते. या पावसामुळे रेल्वे पट्ट्यात असलेले पाली भूतीवली हे लघु पाटबंधारे धरण 18 जुलै रोजी सायंकाळी दुथडी भरून वाहू लागले आहे. मात्र जुलै महिना असल्याने पावसाचा अंदाज लक्षात घेता पाटबंधारे विभागाचे अधिकारी शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने धरणाचे विहिरीमधून धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी धरणाच्या विहिरीमधून पाणी वाहू लागले आहे.

Exit mobile version