मिडलाईन कर्जत विजेता, चौडेश्वरी कडसुरे उपविजेता
| नागोठणे | वार्ताहर |
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य आमदार चषक कबड्डी स्पर्धेत कर्जतच्या मिडलाईन संघाने विजेतेपद तर कडसुरेच्या चौंडेश्वरी संघाने उपविजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिडलाईन कर्जत संघाने चौडेश्वरी कडसुरे संघाचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे रु. 33 हजार 333 च्या रोख बक्षिसासह भव्य अशा आमदार चषकावर आपले नाव कोरले. तर कडसुरे संघाला द्वितीय क्रमांकाचे रु. 22 हजार 222 व चषकावर सामाधान मानावे लागले. तर ज्ञानेश्वर कोलवे व नवतरुण कारावी या संघांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे प्रत्येकी 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक व चषक मिळविला. तसेच वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून कर्जतचा धीरज बैलमारे याला एलईडी टीव्ही, उत्कृष्ट चढाईसाठी कडसुरेचा निखील शिर्के याला कुलर, उत्कृष्ट पकडीसाठी कोलवे संघाचा प्रतिक म्हात्रे याला सायकल तर, पब्लिक हिरो म्हणून कारवी संघाचा राज पाटील याला मिनी फ्रीज देऊन आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तत्पूर्वी या स्पर्धेचा उद्घाटनीय सामन्यात बापदेव वाणी संघाने अमर ओवली संघाचा पराभव केला. तर दुसर्या सामन्यात गावदेवी पाटणसई संघाने गोल्डन रेड मध्ये अमर ओवली संघाचा पराभव केला. परी या छोट्या मुलीने सादर केलेली शिवगर्जनाही लक्षवेधी ठरली. तसेच सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी रोहा येथील शैलेश साळुंखे यांच्या साई डान्स अकॅडमीच्या बाल कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे उद्घाटन खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
खेळायला नक्कीच आवडेल : सिध्दार्थ देसाई
मी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळलो आहे. त्याच तोडीचे नियोजन आज मला याठिकाणी बघायला मिळाले. भविष्यात याठिकाणी राज्य वा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खेळवाव्यात म्हणजे मलाही येथे खेळायची संधी मिळून मला येथे खेळायला आवडेल, अशी प्रतिक्रिया प्रो कबड्डीतील तेलगू टायटनचा स्टार खेळाडू सिध्दार्थ देसाई यांनी व्यक्त केली. तसेच या स्पर्धेदरमदयान सिध्दार्थ याने मैदानात एक चढाई करीत कबड्डी प्रेमींची इच्छा पूर्ण केली.