सकाळी सहा नंतर पहिली लोकल, गर्दीमुळे अपघाताची शक्यता
| नेरळ । वार्ताहर ।
मागील पाच वर्षात एकदाही नवीन लोकल कर्जतसाठी वाढल्या नाहीत. त्यामुळे ठराविक वेळ सोडता कर्जतला मुंबई येथून येण्यासाठी तासाला आणि दीड तासाच्या अंतराने लोकल आहेत. हि बाब तालुक्याच्या विकासाला मारक आहे. पण मध्य रेल्वेला त्याचे काही सोयरंसुतकं नाही असे दिसून आले आहे.
मागील पाच वर्षात कर्जत भागात जाण्यासाठी मुंबई येथून पाच उपनगरीय लोकल देखील वाढल्या नाही हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आधी विरार फास्ट सारख्या आणि पनवेल सारख्या मार्गावर दहा किंवा पंधरा मिनिटाला लोकल गाड्यांची सोय करण्याची गरज आहे. मुंबई येथून कर्जत आणि खोपोली या लोकलचा विचार करता कर्जतला येण्यासाठी सकाळी सहा नंतरच पहिली लोकल पोहचते. त्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत लोकल उपलंब्ध आहेत. पण त्यानंतर येणारी लोकल पन्नास मिनिटांनी तर त्यानंतर कर्जत लोकल एक तास दहा मिनिटांनी आहे. त्यात दुपारच्या वेळी एक वाजून चाळीस मिनिटांनी लोकल सुटल्यानंतर पुन्हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतला यायला साडेतीन वाजता खोपोली लोकल आहे.
अगोदरच मुंबईवरुन कर्जत, खोपोली ह्या लांब पल्याच्या अंतरावर खुपच कमी लोकल गाड्या सोडल्या जात असल्यामुळे लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होऊन अपघात होत असतात. त्यातच भर दुपारच्या वेळेस एक तासांपेक्षा जास्त वेळ कर्जत खोपोली येथील प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात ताटकळत उभे रहावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नवीन लोकल सुरू करता येत नसतील तर किमान ठाणे कर्जत शटल सेवा सुरू करावी अशी अनेक वर्षाची मागणी देखील पूर्ण केली जात नाही. सायंकाळी कर्जत येथून मुंबईकडे जाण्यासाठी देखील अर्ध्या तासाने लोकल झाल्यास त्याचा फायदा कामगार वर्गाला होऊ शकतो. हि स्थिती बदलावी त्यासाठी कर्जत पॅसेजर असोसिएशन प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्न यांना मध्य रेल्वेने हात देण्याची गरज आहे.
कर्जत साठी उपनगरीय लोकल वाढ केली मात्र मुंबई दरम्यान अनेक नवीन थांबे सुरू केले असल्याने दादर स्थानकात कर्जत फास्ट लोकल मध्ये सामान्य प्रवासी यांना चढणे मुश्किल झाले आहे.
अर्जुन तरे
प्रवासी शेलु रेल्वे स्थानक
रात्री पावणे दहा नंतर मुंबईकडे जाण्यासाठी एकही उपनगरीय लोकल नाही, त्यामुळे रात्री बारा पर्यंत किमान दोन लोकल सुरू कराव्यात. तसेच मुंबई पुणे मेन लाईन वरील एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार आप्पा बारणे यांनी प्रयत्न करावेत.
प्रभाकर गंगावणे
सचिव कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन







