महिलांनी दिले मुख्याधिकार्यांना निवेदन
। कर्जत । प्रतिनिधी ।
भिसेगावात भटक्या कुत्रांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे स्थानिकांसह या ठिकाणाहून ये-जा करणार्या नागरिकांवर धावून जात आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक महिलांनी भटक्या कुत्र्यांमुळे होणार्या त्रासाला आळा घाला घालण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
कर्जतमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथून ये-जा करणारे नागरिक, वयोवृद्ध, विद्यार्थी व महिलांवर कुत्रे धावून जात आहेत. तर, कधी चावा घेण्याचादेखील प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बंदोबस्त करण्यासाठी नारीशक्ती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती जाधव, आरटीआय संस्थेचे शहर अध्यक्ष अमोघ कुळकर्णी आणि भिसेगावातील महिलांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन कुत्र्यांपासून होणारा त्रास थांबविण्यात यावा, अशी मागणी निवेदनच्या माध्यमातून केली आहे. त्याचबरोबर जे कोणी या भटक्या कुत्र्यांना खाद्य पुरवतात, अशांवरदेखील कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संगीता कडू, सविता गायकर, शारदा हजारे, नुरी शेख, सिमरन शेख, पल्लवी ठाकरे, हेमांगी पवार, छाया सारंग, स्वप्ना सोनवणे, मोनाली कडू, रुपाली जोशी, मनीषा हजारे, सुनिता खाडे आदी महिला उपस्थित होत्या.
भिसेगाव येथील औदुंबर सोसायटी जवळील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरच नगर परिषदेतील कर्मचारी त्या ठिकाणी येतील.
तानाजी चव्हाण,
मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद
रात्री-अपरात्री कुत्र्यांचा घोळका अंगावर झेप घेतो. तर, रात्रभर ओरडण्याच्या आवाजामुळे लहान मुलबाळ झोपत नाही. भटक्या कुत्र्यांना निवारा नसल्याने दरवाजाबाहेर झोपतात. त्यांना हलविण्याच्या प्रयत्न केल्यास ते गुरगुरतात. त्यामुळे भीती वाटते.
सविता गायकर,
ग्रामस्थ, भिसेगाव