पाणीटंचाईच्या शक्यतेने कर्जतचे प्रशासन सतर्क


| नेरळ | प्रतिनिधी |

यावर्षी पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने जून महिन्यात देखील पाणीटंचाई जाणवणार आहे,त्यामुळे पाणी टंचाई भागात ट्रँकरने पाणी पुरवावे लागणार या शक्यतेने सुधारित आराखडा तयार करावा अशी सूचना आ.महेंद्र थोरवे यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन केली.पाणी टंचाई आणि पाणीपुरवठा संबंधित प्रशासनामधील अधिकारी यांची बैठक कर्जत येथील प्रांत अधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आली होती.

कर्जत तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि सध्याची पाणीटंचाई यावर चर्चा करून नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. प्रांत अजित नैराले,कर्जत तहसीलदार डॉ शीतल रसाळ,खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी,कर्जत गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे,खालापूर गटविकास अधिकारी बालाजी पुरी,पाणी पुरवठा उप अभियंता सुरेश इंगळे,कर्जत पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे,महारष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता तसेच कर्जत पंचायत समिती मधील अधिकारी उपस्थित होते.
थोरवे यांनी दोन्ही तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त भागातील वाड्या वस्त्यांची आणि गावांची माहिती घेतली. सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावी तसेच पाणी टंचाई ग्रस्त वाड्या वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करताना कोणत्याही तक्रारी येणार नाहीत अशी सूचना केली.

तालुक्यात मंजूर असलेल्या जल जीवन मिशन मधील नळपाणी पुरवठा योजना मधील अडचणी अधिकारी वर्गाने प्राधान्य देवून दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली.मात्र त्यासाठी आगामी आठ दिवसात महावितरण,वन विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांच्या सोबतीला संबंधीत गावामधील सरपंच यांना त्या बैठकीला निमंत्रित करण्याची सूचना केली.त्या बैठकीत आपण सर्व जल जीवन मिशन मधील सर्व पाणी योजना यांची माहिती घेवून त्यावर मार्ग काढू,म्हणजे पुढील वर्षी कोणत्याही तालुक्यातील बहुतांशी भागातील नळपाणी योजना यांची कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल असा व्यक्त केला.

Exit mobile version