गत वर्षापेक्षा यंदाच्या दरात दीडपट वाढ
| कर्जत | संजय गायकवाड |
मसाल्याच्या पदार्थांसाठी कर्जतची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. त्यात येथील लाल मिरचीला महिलांची अधिक पसंती असते. त्यामुळे गेल्या 100 वर्षांपासून कर्जत येथील बाजारपेठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची आणि मसाले खरेदी करतात. परंतु, गत वर्षापेक्षा यंदाचे दर दीडपट वाढल्याने मिरची दुप्पट तिखट झाल्याचे ग्राहकांमधून बोलले जात आहे.
हल्ली बाजारात तयार मसाले मिळत असले तरी मिरची खरेदी करून त्यात मसाल्याचे पदार्थ टाकून तिखट मसाला बनविण्याची परंपरा कायम आहे. आपण स्वतः तयार केलेले मसाले जास्त दिवस टिकतात, अशी अनेकांची समज आहे. त्यामुळे ग्राहक खासकरून महिला वर्ग कर्जतच्या बाजारपेठेत येऊन मोठ्या प्रमाणात मिरची व मसाल्यांचे पदार्थ खरेदी करून वर्षभरासाठी मसाला तयार करून ठेवतात. कर्जतमधील हा बाजार केवळ चार ते पाच महिने भरतो. आणि या कालावधीत सुमारे दोन-अडीच कोटी रुपयांची उलाढाल होत असते. सध्या ग्रामीण भागात लग्न सोहळ्यांची देखील मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे. त्यासाठी देखील साधारण वीस ते पंचवीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
थंडी कमी झाली की मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग, पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणे व मुंबईतूनही ग्राहक येत असतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जतमधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. यंदा किंमतीच्या बाबतीत मिरची खूपच तिखट झाली आहे. परंतु, तरीही मिरची व खडे मसाले घेण्यासाठी कर्जत बाजारपेठेतील बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे.
100 वर्षांची परंपरा
सुमारे 100 वर्षांपासून कर्जतचा हा मिरची बाजार भरत आहे. कर्जत शहरातील महावीर पेठेत 10-12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. आज शहरातील बाजारपेठेत दुकानांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, कर्जतच्या बाजारातील मिरची ही महिला वर्गात अधिक प्रिय आहे. हैदराबाद-वारंगल, आंध्रप्रदेश-गंटूर, तेलंगणा अशा अनेक भागांतून मिरची या बाजारात येत असते. या बाजारपेठेत जयंतीलाल परमार, मदन परमार, शिवलाल गुप्ता हे व्यापारी आपल्या तीन-चार पिढ्यांपासून मिरचीचा व्यापार करत आहेत.
मिरची (प्रति किलो)-2025-2026
गंटूर-230 ते 260 रु.-260 रु.
लवंगी-160 ते 180 रु.- 260रु.
बेडगी-250 ते 260 रु.- 500 ते 650 रु.
काश्मिरी-300 ते 450 रु.-650 ते 750 रु.
संकेश्वरी- 200 ते 280 रु.-360 ते 560रु.
पट्टी-230 ते 320 रु.- 400 ते 450 रु.
मी साधारण 60 वर्षे कर्जत शहरात मिरची विकत असून जनतेचा विश्वास आम्ही मिळविला आहे. परंतु, आमच्या नंतर पुढील पिढी या व्यवसाय करीलच याची खात्री नाही. तरी देखील माझी दोन्ही मुले आणि सूना मदतीला असतात. त्यामुळे वर्षाकाठी 800 पोती मिरची विकण्यास मदत होते. एवढी वर्षे खात्रीने आणि सचोटीने व्यवसाय करीत आहे. मी आता 82 वर्षाचा असूनही दररोज किमान 15 तास मिरचीच्या समोर असून देखील मला त्याचा त्रास जाणवत नाही.
जयंतीलाल परमार,
मिरची व्यापारी







