कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत एस टी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले असून विविध कामगार संघटनांचे बहुतांश एस टी कामगार यामध्ये सहभागी झाले आहे. या उपोषणामुळे कर्जत आगारातून गुरुवारी एकही एस टी सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
एस टी कामगारांची वेतन वाढ, महागाई भत्ता, घरभाडे वाढ तसेच राज्य शासनात विलीनीकरण करावे आदी मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आल्याने कर्जत एस टी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी कामगारांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. कर्जत डेपो कृती समिती मधील कामगार संघटना अध्यक्ष रमेश जाधव, सचिव नागेश भरकले, कामगार इंटक संघटनेचे अध्यक्ष कमलाकर किरडे, सचिव सुरेश पाटील, कामगार सेनेचे अध्यक्ष बबन ऐनकर, सचिव विशाल गेडाम यांच्यासह बहुतांश कामगार उपोषणात सहभागी झाले आहेत. या उपोषणाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आज कर्जत एस टी आगारातून एकही एस टी सुटली नसल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.