कर्नाळा सर्कल परिसर होणार वाहतूक कोंडीपासून मुक्त

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीतील कर्नाळा सर्कल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, टपाल नाका, गुरुनानक चौक, आयडीबीआय बँक, भाजप पार्टी ऑफिस, रुपाली सिनेमा टॉकीज अशा विविध बाजूनी येणारे रोड एकत्र येतात, याठिकाणी जवळच बाजारपेठ, भाजी मार्केट व बँका असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत होती. यासंदर्भात वाहतूक शाखेने विविध उपाययोजना करून तो परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशाने कर्नाळा परिसरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने कर्नाळा सर्कलकडे येणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रुपाली सिनेमा या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावर कर्नाळा सर्कलपासून 20 मीटर अंतरापर्यंत कोणतेही वाहन रस्त्यावर पार्क करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनानुसार वाहतूक पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करून कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version