कर्नाळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद

कोव्हिडच्या वाढत्या प्रादुर्भामुळे प्रशासनाचा निर्णय
पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर

। पनवेल । वार्ताहर ।

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने पुन्हा निर्बंध लागू केल्याने पनवेलमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय अभयारण्य प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या 12 किलोमीटरवर कर्नाळा अभयारण्य आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने हा परिसर राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. कर्नाळा अभयारण्यात 642 वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात आहेत. पक्षी निरीक्षणाशिवाय अभयारण्यातील मुख्य आकर्षण कर्नाळा किल्ला आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे.
पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भाग तसेच पनवेल शहरात सध्याच्या घडीला 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्यात आल्याने काही पर्यटकांची हिरमोड झाली आहे. एकीकडे मॉल तसेच हॉटेल सुरु असताना अशाप्रकारे नैसर्गिक पर्यटन बंद ठेवण्यात काय नियोजन आहे? असा प्रश्‍न पर्यटनप्रेमी विचारत आहेत. कर्नाळा अभयारण्यात दररोज किमान 300 पर्यटक येत असतात. सुट्टीच्या दिवशी ही संख्या 500 च्या वर जाते. या पर्यटकांमुळे स्थानिक बचत गटांना रोजगार मिळत असते. मात्र, ते बंद होणार असल्याने बचत गटातील महिलांच्या रोजगारावर गदा येणार आहे.

मॉल चालू नैसर्गिक पर्यटन क्षेत्र बंद
एकीकडे कोरोनाचा शहरात प्रादुर्भाव वाढत असताना मॉल्स, हॉटेल सुरु आहेत. मात्र, दुसरीकडे कर्नाळासारखे नैसर्गिक पर्यटन पर्यटन क्षेत्र बंद ठेवण्याचा प्रयोजन काय? असाही प्रश्‍न पर्यटक उपस्थित करीत आहेत.

Exit mobile version