| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील ‘दादा’ संघ मानल्या जाणाऱ्या आणि तब्बल 42 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढ्य मुंबईला त्यांच्याच घरात धूळ चारत कर्नाटकने रणजी चषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
एमसीए मैदानावर झालेल्या या रोमहर्षक उपांत्यपूर्व लढतीत कर्नाटकने 6 गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे अनुभवी फलंदाज केएल राहुल, ज्याने आपल्या बॅटची जादू दाखवत शानदार 130 धावांची खेळी केली. 326 धावांचे लक्ष्य गाठले. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 326 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकची सुरुवात सावध झाली होती. पहिल्या डावात केवळ 28 धावांवर बाद झालेल्या केएल राहुलने दुसऱ्या डावात मात्र मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः पाणी पाजले. राहुलने 182 चेंडूत 130 धावांची खेळी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले 24 वे शतक झळकावले. त्याने तनुष कोटियनच्या चेंडूवर चौकार लगावून आपले शतक पूर्ण केले तेव्हा मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला. राहुलला दुसऱ्या टोकाकडून युवा फलंदाज आर. स्मरण याने भक्कम साथ दिली. या दोघांमध्ये झालेल्या 147 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीने सामन्याचे पारडे कर्नाटकच्या बाजूने झुकवले. राहुल बाद झाल्यानंतरही स्मरणने आपला संयम ढळू दिला नाही. त्याने नाबाद 83 धावांची खेळी करत चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.







