कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय
बंगळुरु | वृत्तसंस्था |
बंगळुरु गुन्हे शाखेने 2019 मध्ये कर्नाटक प्रीमियर लीग ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील खेळाडू आणि संघ व्यवस्थापन सदस्यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. तीन खेळाडू आणि एका संघाच्या पदाधिकार्याविरोधात सामनानिश्चितीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, सामनानिश्चिती ही भारतीय घटनेच्या 420व्या कलमानुसार फसवणूक नाही. त्यामुळे यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंदवता येणार नाही, असा कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
सामनानिश्चितबाबत कारवाईचा अधिकार हा केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आहे. यासंदर्भात 420व्या कलमानुसार गुन्हा नोंदवता येणार नाही, असे न्यायाधीश श्रीनिवास हरीश कुमार यांनी स्पष्ट केले. सीएम गौतम, अब्रार काझी आणि अमित मावी या तीन खेळाडूंसह एका संघमालकावर 420व्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.