। केप टाउन । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रीका लीगच्या तिसर्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 1 ऑक्टोबर रोजी होणार असून यामध्ये 13 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. याबाबत लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, एसए-20चा आगामी हंगाम 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत खेळवला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक नुकताच पार्ल रॉयल्स सघात सामील झाला आहे, जो या लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय असणार आहे. याशिवाय प्रत्येक संघाला तिसर्या हंगामासाठी नवीन खेळाडूची निवड करावी लागेल. तर, 3 संघांना 30 डिसेंबरपूर्वी वाईल्ड कार्ड जाहीर करावे लागणार आहे. कार्तिक व्यतिरिक्त बेन स्टोक्स, केन विल्यमसन, जो रूट, ट्रेंट बोल्ट, जॉनी बेअरस्टो, डेव्हॉन कॉनवे, जॅक क्रोली, रशीद खान आणि रहमानउल्ला गुरबाज यांसारखे स्टार खेळाडू देखील एसए-20 मध्ये सहभागी होणार आहेत.