। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमिअर लीग 2025 च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी पंजाब किंग्समध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहेत. पंजाब किंग्सचे मालकी हक्क चार जणांकडे असून यापैकी सर्वाधिक हक्क असलेले प्रवर्तक त्यांच्याकडे असलेले काही टक्के शेअर अज्ञात व्यक्तिला विकत असल्याची माहिती समोर येत आहे. याविरोधात प्रीती झिंटाने न्यायालयात धाव घेतली आहे. प्रीतिकडे पंजाब किंग्सचे 28 टक्के शेअर आहेत.
पंजाब किंग्स संघाचे मालकी हक्क केपीएच ड्रिम क्रिकेट प्रा. लि. या कंपनीकडे असून याचे चार भागीदार आहेत. यापैकी एक बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आहे, जिच्याकडे 28 टक्के शेअर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रीतिने पंजाब किंग्सचे सहमालक मोहीत बर्मन यांच्याविरोधात राज्य उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. बर्मन हे त्यांच्याकडे असलेल्या शेअरपैकी काही भाग हे अन्य कोणाला तरी विकत आहेत आणि त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश द्यावा, अशी प्रीतीची मागणी आहे. महत्त्वाचे म्हणजे बर्मन यांच्याकडे केपीएच ड्रिम कंपनीचे सर्वाधिक 48 टक्के शेअर्स आहेत. नेस वाडिया हे तिसरे मालक आहेत आणि त्यांच्याकडे 23 टक्के, तर उर्वरित शेअर्स हे करण पॉल यांच्या नावावर आहेत.
दरम्यान, डाबर कंपनीशी संबंधित असलेले बर्मन यांनी शुक्रवारी (दि.16) सांगीतले की, शेअर्स विकण्याचा माझा कोणताही विचार नाही. तथापि, बर्मन यांचा 11.5 टक्के शेअर्स अज्ञात व्यक्तिला विकण्याचा मानस असल्याचे अहवालात म्हटले आहे.