। दुबई । वृत्तसंस्था ।
बांगलादेशमध्ये नवे सरकार स्थापन झालेले असले तरी तेथील अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या सुरुवातीस सुरू होत असलेल्या महिला टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य अधांतरी आहे. भारताने आयोजनास नकार दिल्यानंतर आता ही स्पर्धा दुबई-अबुधाबी येथे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टी-20 विश्वकरंडक ही प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याने आपल्या देशात खेळवण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळ प्रयत्न करत आहे. त्यांनी आयसीसीकडे थोडा वेळ मागितला आहे. परंतु, आयसीसी मंगळवार दि.20 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे. याच दिवशी सर्व सदस्यांसह ऑनलाइन बैठक होणार आहे. आयसीसी बांग्लादेश सारख्या देशाच्या शोधात आहे, जिथे महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करता येईल. तो बांग्लादेशसारखाच टाइम झोन असलेला देश पाहत आहे. जेथे हवामानाची कोणतीही समस्या नसावी. या स्थितीत युएई परफेक्ट आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाकडे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. यजमानपदासाठी झिम्बाब्वे आणि श्रीलंकाही इच्छुक आहेत. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
3 ते 20 ऑक्टोबर असा स्पर्धेचा कालावधी आहे. त्यात 10 संघ सहभागी असून एकूण 23 सामने होणार आहेत. परंतु, 26 ऑगस्टपासूनच सराव सामने होणार आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या पदाधिकार्यांनी आमच्याकडे आणखी पाच दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे 20 तारखेच्या बैठकीत आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असे आयसीसीच्या पदाधिकार्याने स्पष्ट केले आहे.